चिमूर (चंद्रपूर) : ताडोबाच्या खडसंगी बफर वनपरिक्षेत्रालगत वाहानगाव शिवारात मंगळवारी छोटा मटका व बजरंग या दोन वाघांमध्ये शिकारीवरून झुंज झाली. यामध्ये बजरंगचा मृत्यू झाला. तर छोटा मटकासुद्धा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर वेळीच उपचार झाले नाही तर त्यांच्या जिवाला धोकाही होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन वनविभागाने छोटा मटका नावाच्या वाघाला शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. मात्र त्याचा कुठेही शोध लागला नाही.
चिमूर प्रादेशिक वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या वाहानगाव येथील सुभाष दोडके यांच्या शेतात छोटा मटका व बजरंग या दोन वाघांमध्ये कडवी झुंज झाली. बजरंगच्या मानेवर, डोक्यावर, पायावर मोठमोठ्या जखमा झाल्या होत्या. त्यामुळे बजरंग घटनास्थळीच गतप्राण झाला होता. या झुंजीत छोटा मटकासुद्धा गंभीर जखमी झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जखमी छोटा मटका आता कोणत्या परिस्थितीत आहे. याची खातरजमा करून त्याला उपचाराची गरज आहे काय, या दृष्टीने वनविभागातर्फे छोटा मटका शोधमोहीम राबविण्यात येत आहे.
खडसंगी बफर वनपरिक्षेत्राअंतर्गत अधिकारी, कर्मचारी, वनमजूर, गाइड यांच्यासह ५० ते ६० कर्मचारी बुधवारी सकाळपासून त्या परिसरात पायी गस्त घालत आहे. ज्या परिसरात बजरंग व छोटा मटका यांच्यामध्ये झुंज झाली त्या परिसरात दहा ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहे. दुसरा दिवस उलटला तरी छोटा मटका कर्मचाऱ्यांना दिसला नसल्याचे सांगितले जात आहे.
छोटा मटकाचा शोध सुरू आहे. छोटा मटका गंभीर जखमी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिसरातील एका नाल्याच्या पलीकडे पगमार्क आढळून आले आहेत. या आधारेही शोधमोहीम राबविली जात आहे.
- किरण धानकुटे, वनपरिक्षेत्र अधिकारी, (बफर) खडसंगी, ता. चिमूर