चंद्रपूर : जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्यावर मूल येथे गोळीबार झाल्यानंतर आरोपींच्या अटकेसाठी काँग्रेसतर्फे जिल्हाभरात आंदोलन करून पोलिसांना निवेदन देण्यात आले होते. दरम्यान, गोळीबारातील आरोपी व काँग्रेसचा उत्तर भारतीय ग्रामीण सेल अध्यक्ष राजबीर यादव याला पोलिसांनी अटक केली. या अटकेनंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडूनच परस्परविरोधी आरोप-प्रत्यारोप झडू लागले. त्यामुळे जिल्हाभरातील सामान्य कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होऊन राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्यावर गोळीबार प्रकरणी अटकेतील आरोपींनी वेकोलिमध्ये नोकरी लावून देतो, असे सांगून त्यांनी पैसे घेतल्याचे बयाण दिले. गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना अटक व्हावी, यासाठी काँग्रेसचे माजी मंत्री व आमदार विजय वडेट्टीवार यांनी आरोपींची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. दरम्यान, गोळीबार करणाऱ्या आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी माझ्यावर खोटा आरोप केला. माझ्यावरील हल्ल्याचा मास्टरमाइंड वेगळाच असल्याचा दावा रावत यांनी केला. याशिवाय स्वत:सह आरोपींची नार्को टेस्ट करण्याचे खुले आव्हान दिले. राजकीय वातावरण ढवळून निघत असतानाच या प्रकरणात काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांनी उडी घेत थेट जिल्हा बँकेच्या सर्व संचालकांची नार्को टेस्टची मागणी केल्याने संचालकांमध्ये खळबळ उडाली. संचालकांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन पदावरून हटविण्याची मागणी केली. या घडामोडीमुळे काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राजबिर यादवची हकालपट्टी
पोलिसांनी गोळीबार प्रकरणाचा तपास करीत आरोपी व काँग्रेसचा उत्तर भारतीय ग्रामीण सेल अध्यक्ष यादव याला अटक केली. त्यानंतर शुक्रवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तसेच उत्तर भारतीय सेल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमाकांत अग्निहोत्री यांनी यादवची उत्तर भारतीय ग्रामीण सेल अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. दरम्यान, पोलिसांनी गोळीबार प्रकरणात वापरलेले वाहन व बंदूक जप्त केली. या प्रकरणाचा तपास खोलात जाऊन करीत असल्याची माहिती तपास अधिकारी गडचांदूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी दिली.