विषबाधा तर नव्हे ? : प्रतीक्षा डीएनए अहवालाचीचंद्रपूर : जवळच असलेल्या डोणी या गावाजवळ ५ मे रोजी सडलेल्या अवस्थेत मृत आढळलेल्या वाघाच्या मृत्यूचे कारण अद्यापही अंधारातच आहे. मृत वाघाचा व्हिसेरा आणि डीएनए अहवाल पुढे येत नाही तोपर्यंत अंधारात चाचपडण्याशिवाय वनविभागाच्या तपासकर्त्या यंत्रणेला गत्यंंतर राहिलेले दिसत नाही.ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्याच्या क्षेत्रात येणाऱ्या डोणी गावाजवळ हा वाघ मृतावस्थेत आढळल्याने त्याच्या मृत्यूचे गुढ अधिकच वाढले आहे. कम्पार्टमेंट क्रमांक ३४८ मध्ये हा दोन वर्षे वयाचा वाघ मृतावस्थेत आढळला होता. या कंपार्टमेंटपासून गावकऱ्यांचे सतत जाणे-येणे असते. तरीही वाघ मृत झाल्यावर सडेपर्यंत कुणाच्याही लक्षात कसे आले नाही, वन विभागाकडे कुणी माहिती का पोहचविली नाही, हा शंकेचा प्रश्न ठरत आहे. वाघाच्या मृत्यूची वार्ता वनविभागाला कळली तेव्हा त्याचे शव एवढे गळाले होते की जागेवरच पंचनामा करून अवयव जाळावे लागले. वाघच्या मृत्यूसंदर्भात नेमके कारण अद्याप पुढे आलेले नाही. ज्या ठिकाणी वाघ मृतावस्थेत आढळला होता, त्याच्या काही अंतरावरच काही दिवसांपूर्वी एका जनावराची शिकार झाली होती अशी माहिती वनविभागाकडे आहे. त्यानंतर काही दिवसातच त्याच परिसरात हा वाघही मृतावस्थेत आढळल्याने शंका वाढल्या आहेत. एकंदर परिस्थिती लक्षात घेता विषबाधेतून तर वाघाचा मृत्यू झाला नसावा, अशी शंका आता वनाधिकाऱ्यांनाही स्पर्शून जात आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाच्या नागपूर क्षेत्रीय कार्यालयाच्या उपमहानिरीक्षकांनी ११ जूनला डोनी गावात आणि परिसरात येवून पहाणी केली, गावकऱ्यांशीही चर्चा केली. त्यामुळे उत्सुकता वाढली आहे. एक महिन्यानंतरही वनविभागाने मृत वाघ आणि त्याच्या बछड्यांचा शवविच्छेदन अहवाल, डीएनए अहवाल उघड केलेला नाही. त्यामुळे वन्यजीवप्रेमींही अस्वस्थ आहेत. सावली तालुक्यातील पाथरी गावाजवळे मृतावस्थेत आढळलेल्या चार बछड्यांचा आणि त्यांच्या बेपत्ता मातेसंदर्भातील प्रकरणीही असेच गुलदस्त्यात आहे. एफडीसीएम आणि वनविभाग यावर काहीही सांगयला तयार नाही. तपासासाठी दोन समित्या तयार करूनही अद्याप अहवाल जनतेसमोर का मांडला जात नाही, हे एक कोडेच ठरले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)