लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासनाने ग्रामीण भागात इयत्ता १ ते ४ आणि शहरी भागात इयत्ता १ ते ७ वीपर्यंतच्या शाळांना परवागनी दिल्याने जिल्ह्यात आज सुमारे १२०० शाळांचे वर्ग सुरू झाले. दोन वर्षांपासून घरीच राहिलेले विद्यार्थी प्रथमच शाळेत आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. शिक्षकांनी मुलांचे स्वागत करून कोरोनापासून कसे सुरक्षित राहावे, याबाबत सूचना केल्या. मात्र, चंद्रपूरसह तालुकास्थळावरील बहुतांश इंग्रजी कॉन्व्हेट शाळांनी अद्याप वर्ग सुरू केले नाही. महानगरपालिका शाळांतही अशीच स्थिती दिसून आली.जिल्हा परिषद शाळांतील सर्व वर्ग सुरू करण्यात आले. राज्य शासनाने सर्व वर्ग सुरू करण्यास मंजुरी देताना कोरोना प्रतिबंधक नियमावली जाहीर केली होती. त्यामुळे मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेत सुरुवातीला स्वच्छतेचा उपक्रम राबविला. मुलांना वर्गात बसविताना अंतर ठेवण्यात आले. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घ्यावे. लसीकरण झाले नाही. या कारणास्तव अनुपस्थित राहता येणार नाही, अशा सूचना असल्याने शिक्षकांची आज १०० टक्के उपस्थिती होती. ग्रामीण भागात पहिली ते चौथी व शहरी भागात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांनी पालकांच्या भेटी घेऊन संवाद साधला.
असा गेला शाळेचा पहिला दिवसमुलांच्या प्रकृतीची चौकशी करण्यात आली. कुटुंबात कुणी आजारी आहेत, याबाबतही शिक्षकांनी विचारणा केली. वर्गात आल्यानंतर सर्वांना सॅनिटायझर वाटप करण्यात आले. पहिली तासिका आरोग्य व स्वच्छतेवर घेण्यात आली. वर्गात अंतर ठेवून बसविण्यात आले. मागे पडलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या सूचना असल्याने शिक्षकांनी नियोजनानुसार पहिल्या दिवशी अध्यापन केले. मुलांनी आज जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात मनसोक्त खेळल्याचे दिसून आले. मनपा शाळा आज बंद होत्या.
इंग्रजी शाळांना प्रशासनाच्या परवानगीची प्रतीक्षाचंद्रपूर व तालुकास्थळावरील खासगी इंग्रजी शाळांनी १ ते ४ वर्ग अजूनही सुरू केले. काही इंग्रजी शाळांनी आज पालकांची ऑनलाइन सभा घेऊन शाळा सुरू करण्याबाबत मते जाणून घेतली. प्रशासनाकडून परवानगी घेतल्यानंतर अंतिम निर्णय ठरणार आहे.