चंद्रपूर : कोविड रुग्णांवर तातडीने उपचार करता यावे, यासाठी बल्लारपूरसाठी चार व मानोरा गावासाठी एक ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले. विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा व बल्लारपूर तालुका भाजपचे सरचिटणी रमेश पिपरे यांना ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर सुपुर्द केले.
कोरोना रुग्णांसाठी आ.सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने यापूर्वी १५ एनआयव्ही, दोन मिनी व्हेंटिलेटर आणि १५ मोठे व्हेंटिलेटर जिल्हा रुग्णालयासाठी उपलब्ध करून दिले. याशिवाय बल्लारपूर १०, मूल व पोंभुर्णासाठी प्रत्येकी सहा व चंद्रपूरसाठी तीन असे २५ ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर दिले. बल्लारपूर नजिक भिवकुंड विसापूर येथे आ.मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने १०० बेड्सचे कोविड केअर सेंटर सुरू झाले. आमदार निधीतून दोन रुग्णवाहिका व १०० पीपीई किट उपलब्ध करून दिल्या आहेत. रुग्णसंख्येच्या प्रमाणात व्हेंटिलेटरची संख्या कमी आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत फक्त ८४ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. व्हेंटिलेटरअभावी मृत्युंची संख्या जास्त आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने व्हेंटिलेटरची संख्या वाढविण्याची मागणी आ.मुनगंटीवार यांनी केली.