राजुरा : सध्या विद्यार्थ्यांंना जागतिक स्तरावर स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. यासाठी पूर्व प्राथमिक शिक्षणापासून विद्यार्थ्यांचा पाया मजबूत असावा लागतो. कृतिशील, आनंददायी शिक्षण देतानाच विद्यार्थ्यांत चरित्र, आत्मविश्वास व प्रामाणिकपणाचे धडे दिले तर ही संस्कारशील मुले उद्याचे संपन्न व जागरूक नागरिक बनू शकतील. यासाठी शिक्षकांनी अतिशय महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी, असे मत माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले.
स्थानिक रामनगर येथे विधाता फाउंडेशनद्वारे ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कूलच्या प्रवेश उत्सव कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार ॲड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर यांनीही मार्गदर्शन केले. नगराध्यक्ष अरुण धोटे, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी सुधाकर अडबाले, वणी पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे, पालिका सभापती राधेश्याम अडानिया, माजी नगराध्यक्ष रमेश नळे, अविनाश जाधव, ॲड.अरुण धोटे, नगरसेवक दिलीप डेरकर, विशाल खंडाळकर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
प्रास्ताविक ॲड. मनोज काकडे, संचालन जयश्री मालेकर व आभार शुभांगी धोटे यांनी मानले. यावेळी चित्रकला स्पर्धेत पुरस्कार प्राप्त आराध्या पांडे, नरेंद्र ढवस, मनस्वी बोबडे, मुग्धा मोरे यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मोहन धोटे, संदीप मालेकर, शशांक धोटे, केशव ठाकरे, शेख आणि पालक उपस्थित होते.