लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर: ब्रह्मपुरी शहरात कोरोनाचा रूग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना थेट गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश नाकारला. त्यामुळे सात गावातील संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी वैनगंगा नदी पुलावर ब्रह्मपुरी-वडसा मार्गावर दीडतास चक्का जाम आंदोलन केले. या आंदोलनामुळे शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.ब्रह्मपुरी तालुक्यातील शेकडो शेतकरी दूध, दही, भाजीपाला विक्री व जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील वडसा शहरात दररोज ये-जा करतात.
नागपूर शहरातून जीवनावश्यक वस्तू घेवून येणारी वाहने ब्रह्मपुरी मागार्नेच वडसा शहरात प्रवेश करतात. मात्र, ब्रह्मपुरीत कोरोना रूग्ण आढळताच गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून वैनगंगा नदीपूल ओलांडून ८ किमी अंतरावरील वडसा शहरात प्रवेशबंदी लादली. परिणामी ब्रम्हपुरी तालुक्यातील हरदोली, चिंचोली, चिखलगाव, लाडज, सोंद्री, सोनेगाव, सावलगाव येथील शेतकऱ्यांना दूध, दही, भाजीपाला व अन्य शेतमाल वडसा शहरात विकण्याचा मार्ग बंद झाला. संतापलेल्या शेतकऱ्यांनी वैनगंगा पुलावर झाडे, लाकूड व दगड टाकून चक्काजाम आंदोलन सुरू केले. यानंतर वडसा तहसीलदार, मुख्याधिकारी, ब्रह्मपुरी तहसीलदार विजय पवार, वडसा व ब्रम्हपुरी पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. अधिकाऱ्यांनी वरिष्ठांची चर्चा करून समस्या सोडविण्याचे आश्वासन देताच मार्ग मोकळा केला.सात गावांमध्ये कोरोनाचा रूग्णच नसताना बंदी का ?वैनगंगा नदीकिनारी वसलेल्या ब्रह्मपुरी तालुक्यातील सात गावांची नाळ गडचिरोली जिल्ह्यातील वडसा शहराशी जोडली आहे. या शहरातील बाजारपेठेत दररोज शेकडो नागरिकांची ये-जा सुरू असते. हरदोली, चिंचोली, चिखलगाव, लाडज, सोंद्री, सोनेगाव, सावलगाव येथे कोरोनाचा एकही रूग्ण आढळला नाही. त्यामुळे गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी थेट प्रवेशना कारणे अन्यायकारक आहे, अशी नाराजी शेतकऱ्यांनी लोकमतजवळ व्यक्त केली.