गोंडपिपरी : विभागीय कार्यालय आता गडचिरोली येथे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गोंडपिपरी येथे आगार होणार असल्याची शक्यता होती. मात्र, महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच याला ब्रेक लावल्याची चर्चा आहे.जिल्ह्यातील विकसित तालुक्यापैकी एक तालुका म्हणून गोंडपिपरीची ओळख आहे. मात्र, अन्य तालुक्याच्या तुलनेत हा तालुका काही प्रमाणात मागे आहे. गोंडपिपरी परिसरात शैक्षणिक संस्था, प्रशासकीय कार्यालये, रुग्णालये, तारायंत्र कार्यालय, पोलीस ठाणे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे. यामुळे तालुक्यातील खेड्यापाड्यातील नागरिक नेहमीच येते येतात. धाबा येथे संत कोंडय्या महाराज मंदिर, धनवंती माँ दरगाह, चपराळा धाम लागूनच आहे. आष्टी पेपरमिलही जवळच आहे. सध्या करंजी येथे एमआयडीसी सुरू होण्याच्या मार्गावर आहे. वर्धा नदीवर पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यामुळे कागजनगर ते गोंडपिपरी मार्गावरील दळणवळण वाढणार आहे. त्यामुळे गोंडपिपरी हे मुख्य शहर दोन्ही राज्यांना जोडणारा दुवा ठरणार आहे. गोंडपिपरी हे मध्यवर्ती ठिकाण असून, चारही दिशांना मुख्य मार्ग आहेत. पूर्वेस अहेरी, पश्चिमेस बल्लारशाह, उत्तरेस मूल-सावली आणि दक्षिणेस आंध्र प्रदेश आहे. या सर्वांचा विचार केल्यास येथे एस.टी. बस आगार होणे महत्वाचे आहे. सध्या गोंडपिपरी येथे मानव विकासाच्या निळ्या गाड्या अहेरीवरून व चंद्रपूरवरून रिकाम्या येतात. रात्री या गाड्यांचा येथे मुक्काम असतो. पूर्वी चंद्रपुरात विभागीय कार्यालय होते. आता गडचिरोली विभागीय कार्यालय होत आहे. त्यामुळे गोंडपिपरी येथे मुख्य एस.टी. बस आगाराची मुख्य गरज आहे. वरिष्ठांनी लक्ष देऊन आगार दिल्यास जनतेच्या सेवेसाठी हे एस.टी. चे ब्रीद वाक्य सत्य ठरेल. (तालुका प्रतिनिधी)
आगाराच्या स्वप्नाला महामंडळाचा ‘ब्रेक’
By admin | Published: October 26, 2014 10:38 PM