लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : नागभीड तालुक्यात शेतीचा हंगाम जोरात सुरू आहे. या हंगामामुळे ग्रामीण भागाच्या अर्थचक्रास कमालीची गती मिळाली आहे. हातात पैसा खेळू लागल्याने बाजारपेठाही फुलल्या आहेत.
सद्यस्थितीत रोवणी सुरू आहे. गेल्या १५ ते २० दिवसांपासून सुरू असलेली ही रोवणी आणखी १०, १२ दिवस चालेल. रोवणीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यावेळी कितीही मजूर असोत तरी ते कमीच पडतात. अनेक मोठ्या शेतकऱ्यांना रोवणीसाठी बाहेरून मजूर आणावे रागतात. एका महिला मजुराला एका दिवसाचे २०० ते २५० रुपये तर पुरुषाला ३०० रुपये या काळात मजुरी मिळत असते. ही रोवणी संपत नाही तोच निंदण काढण्याचे काम सुरू होते. जवळपास एक महिना हे काम चालते. या काळातही महिलेला १२५ ते १५० रुपये मजुरी मिळत असते. तोवर ऑक्टोबरपर्यंत हलके धान कापणीस येतात. धान कापणीचे हे काम डिसेंबर महिन्यापर्यंत चालत असते. या काळातही महिला आणि पुरुषांना मोठ्या प्रमाणात काम उपलब्ध होत असते.
अनेकांचे अर्थार्जन
या काळात शेती हंगामाच्या अनुषंगाने विविध मजुरांना काम उपलब्ध होतेच; पण त्याचबरोबर शेतीशी संबंधित असलेल्या विविध क्षेत्रांचे अर्थाजन होत असते. यात खतांची खरेदी-विक्री आहे. शेतीत आता यांत्रिकीकरणाचा प्रवेश झाल्याने ट्रॅक्टर मालक-चालकांना यातून काम उपलब्ध होत आहे. यातूनही मोठी उलाढाल होत असते.
'ती' शक्ती फक्त शेतीतच
शासनाने मग्रारोहयोच्या माध्यमातून प्रत्येकाच्या हाताला काम देण्याचे कबुल केले असले तरी शासनाचे हे आश्वासन अभावानेच नागभीड तालुक्यात दिसून येते; मात्र सर्वांना रोजगार उपलब्ध करून देण्याची शक्ती फक्त शेतीतच आहे. हे सध्या सुरू असलेल्या हंगामात दिसून येत आहे.