संतोष कुंंडकर - चंद्रपूरयंदा निसर्गाच्या प्रकोपाचा फटका शेतकऱ्यांना बसला. जुलै महिन्याचा पहिला आठवडा उलटला असला तरी अद्याप जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली नाही. परिणामी सुरूवातीच्या काळात झालेल्या पाच टक्के पेरण्या मोडल्या, असा दावा कृषी विभागाने केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाळी वातावरण असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून जिल्ह्यात पेरणीच्या कामाला वेग आला आहे.आतापर्यंत चार लाख ६० हजार हेक्टरपैकी एक लाख ३५ हजार ४८५ हेक्टरवरील पेरण्या आटोपल्या असून त्याची सरासरी टक्केवारी ३२ आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सिंदेवाही, सावली, नागभीड, ब्रह्मपुरी, चिमूर, गोंडपिपरी, पोंभुर्णा या भागात धानाची लागवड केली जाते. या तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी जून महिन्यात झालेल्या पहिल्याच हलक्या स्वरूपाच्या पावसानंतर धानाचे पऱ्हे टाकले. मात्र पावसाअभावी व तिव्र उन्हामुळे हे पऱ्हे करपून गेलेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. तेव्हापासून पावासाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात धानासह सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी या पिकांचीही मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येते. जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, बल्लारपूर, राजुरा, कोरपना जीवती या तालुक्यांमध्ये कापूस व सोयाबिनची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. या भागातील शेतकऱ्यांनीही सुरूवातीच्या काळात पेरणी केली. मात्र पावसाअभावी पेरण्या मोडून गेल्या. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. यंदा पावसाचे आगमन बरेच लांबणीवर पडले असले तरी जुलैच्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांना पेरण्या करता येऊ शकतात. त्यामुळे वेळापत्रक कोलमडणार नाही, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
कृषी विभाग म्हणतो, केवळ पाच टक्के पेरण्यांना मोड
By admin | Published: July 14, 2014 11:52 PM