वरोरा : मागील काही वर्षात ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना चांगले आरोग्य मिळावे याकरीता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागात मुख्य व्यवसाय शेती आहे. शेती फायदेशीररित्या करता यावी याकरीता तज्ञांना सोबत घेऊन प्रत्येक पंचायत समितीम गणामध्ये वर्षभरात दोन ते तीन कृषी मेळावे आयोजित करण्याचा मानस आमदार बाळू धानोरकर यांनी माढेळी, नागरी, चिकणी येथील कृषी विभागाच्या क्षेत्रीय भेटी प्रसंगी व्यक्त केला.अकाली पाऊस व वादळ आल्याने वरोरा परिसरातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या कापसाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कपासीचे झाडे जमिनीपासून उन्मळून गेले. लाल्या रोगाचा प्रादूर्भाव आल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. या नुकसानीची पाहणी करण्याकरीता आमदार बाळू धानोरकर यांनी पंजाबराव देशमुख विद्यापीठ संशोधन केंद्र एकार्जूनाचे संशोधक प्रशांत राऊत, प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी अशोक खंगन, कृषी विभागाचे प्रवीण निवस्कर, कृषी अधिकारी, कर्मचारी यांनी माढेळी येथील मनोज देवतळे, प्रमोद जामुनकर, येवतीचे चंपत चिंचोळकर, रामचंद्र येरचे यांच्या शेतात जावून गुरूवारी कपाशी, तूर व सोयाबीन पिकाची पाहणी केली. मागील आठवड्यात झालेल्या अकाली पाऊस व वादळाचा तडाखा कपाशीच्या पिकाला बसला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये ज्या कपाशीच्या झाडाला तडाखा बसला आहे, त्या झाडाचे संगोपन कशा पद्धतीने करावे, याचे प्रात्यक्षिक कपाशीच्या शेतात एकार्जूना फार्म हाऊसचे संशोधक प्रशांत राऊत व प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी अशोक खंगन यांनी करुन दाखवित शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिले. तत्पुर्वी माढेळी येथील शेतकरी भवनामध्ये आयोजित शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम माढेळीच्या सरपंच आशा हिकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी आमदार बाळू धानोरकरल, जि.प.चे माजी बांधकाम व अर्थ सभापती प्रकाशचंद्र मुथा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माढेळीचे उपसरपंच तथा शिवसेना तालुका प्रमुख विशाल बदखल, जिल्हा परिषद सदस्य नितीन मत्ते, माजी पंचायत समिती उपसभापती दत्ता बोरेकर, माढेळी ग्राम पंंचायतच्या सदस्य नानेबाई वाळके उपस्थित होत्या. नागरी व चिकणी येथे शेतकऱ्यांना माजी पंचायत समिती सभापती दिलीप टिपले, चिकणी उपसरपंच किशोर बांधे यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन करण्यात आले. सध्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतात कपाशीचे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करुन तातडीने अहवाल तयार करण्याचे आदेश कृषी विभागास आमदार बाळू धानोरकर यांनी देत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्याकरिता शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार धानोरकर यांनी दिले.
पंचायत समिती क्षेत्रात कृषी मेळावे राबविणार
By admin | Published: September 26, 2015 12:58 AM