साखरवाही ते अहेरी या गावाकडे जाण्यासाठी तलाठी नकाशावर अनेक वर्षांपासून पांदण रस्ता आहे. साखरवाही येथील ६० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा हा रहदारीचा रस्ता आहे. परंतु पावसाळ्यात या रस्त्यावरून जनावरे व शेतकऱ्यांना जाण्यास मोठी कसरत करावी लागते. चिखलातून जाताना बऱ्याच शेतकऱ्यांच्या बैलांच्या पायाला दुखापत झाली आहे. दरम्यान या रस्त्याचे श्रमदानातून शेतकऱ्यांनी दगड आणि मुरूम टाकून मजबुतीकरण करणे सुरू केले. अशातच या रस्त्यालगत असलेल्या काही शेतकऱ्यांनी आडकाठी आणीत हा रस्ता बंद केला. त्यामुळे त्याबाबत साखरवाही येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले. मात्र कोणतीही दखल न घेतल्याने अखेर समस्त गावकऱ्यांनी बंद केलेला सार्वजनिक रस्ता मोकळा केला आणि श्रमदानातून या रस्त्यावर दगड मुरूम टाकले जात आहे. सोबतच परत एकदा तहसीलदार यांना निवेदन देऊन रेकाॅर्ड नुसार असलेला हा पांदण रस्ता मोकळा करून द्यावा. अन्यथा गावात या विषयावरून शांतता भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.
अहेरी -साखरवाही पांदण रस्ता मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 4:21 AM