चंद्रपूर : जिल्ह्यातील अपघाताचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी १५ दिवसांत कृती आराखडा तयार करून उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हा प्रशासन व उपप्रादेशिक परिवहन विभागाला दिली. रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रमानिमित्त मंगळवारी जिल्हा नियोजन सभागृहात ते बोलत होते.
यावेळी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, स्वयंसेवी संस्था, व्यापारी असोसिएशन व वाहन वितरकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. खा. धानोरकर म्हणाले, वाहतूक पोलिसांनी केवळ चालान करून फक्त महसूल गोळा करण्याचा उद्देश न ठेवता नागरिकांना वाहतूक शिस्तीचे धडे देण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. थ्री व्हिलर्स व माल वाहतूकदारांचे टेल लॅम्प व रिफ्लेेक्टर्ससाठी विशेष तपासणी मोहीम राबवावी. गांधी चौक ते जेटपुरा गेट परिसरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त आहेत. दुकानांसमोरील पार्किंग वाहनांमुळे रस्त्याचा ६० टक्के भाग व्यापतो. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशीही सूचना खासदार धानोरकर यांनी केली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मोरे व जिल्हा शल्य चिकित्सक राठोड यांनी उपक्रम व योजनांची माहिती दिली.