१० दिवसांत नौकरी व मोबदला - मिश्रावरोरा : वेकोलिच्या वतीने तालुक्यातील एकोना येथे खुली कोळसा खदान प्रस्तावित असून प्रकल्पग्रस्तांना मागण्या मागील चार वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत भद्रावती येथे एक बैठक नुकतीच झाली. या बैठकीत एकोना माईन्स क्रमांक एक मधील प्रकल्प ग्रस्तांना नौकरी व मोबदला येत्या १० दिवसांत देण्याचे आश्वासन वेकोलीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आर. आर. मिश्रा यांनी दिली असून प्रकल्पग्रस्तांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.वरोरा तालुक्यातील एकोना गावाच्या परिसरातील २५० हेक्टर जमिनीमध्ये वेस्टर्न कोलडिल्ड लिमिटेडच्या वतीने खुली कोळसा खाण सुरु करण्यात येणार आहे. २००८ मध्ये या जमिनीवर सेक्शन ९ लागू करण्यात आले. त्यानंतर २०१२ मध्ये सेक्शन ११-ए लागू करण्यात आला. या चार वर्षांत वेकोलिच्या वतीने प्रकल्पग्रस्तांना नोकरी व मोबदला देण्यात आला नाही. सेक्शन ११ - ए लागू झाल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी आपली शेतीही करु शकत नाही. त्या शेतीवर कर्जही घेऊ शकत नाही. तसेच १६३ प्रकल्पग्रस्तांमध्ये अनेकांचे नोकरीसाठी आवश्यक वयही वाढत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त कशा हालअपेष्टा भोगत आहेत, याबाबत आ. बाळू धानोरकर यांनी सीएमडी आर. आर. मिश्रा यांच्याकडे व्यथा मांडली. प्रकल्पग्रस्तांच्या समस्या आ. धानोरकर यांनी बैठकीत सादर केल्या. प्रकल्पग्रस्तांची कैफीयत ऐकून एमडी आर. आर. मिश्रा यांनी तातडीने ऐकोना क्रमांक - १ चालू करण्याच्या हालचालीना वेग देणार असल्याचे सांगत येत्या १० दिवसांत प्रकल्पग्रस्तांना नौकरी व मोबदला देण्याचे आश्वासनही या प्रसंगी दिले. यावेळी वेकालि कुचनाचे महाप्रबंधक पांडे उपस्थित होते. वरोरा न.प. निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना वेळ काढून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्याकरिता आ. बाळू धानोरकर यांनी वेळ दिल्याने प्रकल्प ग्रस्तांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
एकोना कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2016 12:53 AM