दत्तात्रय दलाललोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : अठरा वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला मद्य पिण्याकरिता व विकत देताना विक्रेत्याला त्याच्याकडे परवाना आहे किंवा नाही, याची खातरजमा करणे आवश्यक आहे. मात्र, येथील कोणत्याही बारमध्ये परवाना बघितला जात नाही. पिणाऱ्याकडे परवाना नसताना विक्रेत्यांकडून दारुची सरसकट विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार सुरु आहे.जिल्ह्यातील बंद करण्यात असलेली दारु विक्री काही महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आली. शहरात केवळ बार व देशी भट्ट्या चालू आहेत. बार किंवा परवानाप्राप्त दारु दुकान चालविण्याकरिता अबकारी विभागाने विविध शर्ती, अटी व नियमांचे पालन परवानाधारक विक्रेत्याने करावे, असे बंधन घालून दिले आहे. त्या अटी, शर्तींची पूर्तता विक्रेत्यांवर बंधनकारक आहे. यात पिणाऱ्याकडे दारु पिण्याचा परवाना आहे किंवा नाही, याची विक्रेत्याला खातरजमा करावी लागते. शिवाय रोज झालेली विक्री किती परवानाधारकांना करण्यात आली, याचा लेखाजोखा ठेवणे आवश्यक आहे. तसा मासिक हिशेब अबकारी विभागाकडे सादर करावा लागतो. असे असतानाही बारमध्ये विनापरवाना मद्य विकण्यात येत आहे. मासिक अहवाल दाखल करताना दैनिक विक्री कोणत्या परवान्यावर दाखविण्यात येते, असा प्रश्न निर्माण होत आहे.
अनेक ठिकाणी रस्त्यावर वाहनेअनेक बार तसेच दुकानांना पार्किंगची व्यवस्था नसल्याने चक्क रस्त्यावर वाहने उभी ठेवण्यात येतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. रात्रीच्या वेळेस महिलांना घराबाहेर निघणे अशक्य झाले आहे. अनेकदा वाहने काढताना अपघातही झाले आहेत. याबाबत नागरिकांकडून वारंवार ओरड होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते.