लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील गुन्हेसिद्धीचा दर समाधानकारक आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे पोलिसांचे काम उत्तम असून, गुन्ह्यांचे प्रमाण जास्त असणाऱ्या तालुक्यांसाठी खास पथक निर्माण करण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठकीत दिले. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस उपअधीक्षक (गृह) शेखर देशमुख, चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदनवार व सर्व ठाणेदार उपस्थित होते. पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, पोलिसांनी गुन्हे दाखल करताना घटनेचा सांगोपांग विचार करून दोष सिद्धीचे अंतिम लक्ष डोक्यात ठेवावे. एकदा गुन्हा दाखल झाला तर कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही, अशी भीती गुन्हे करणाऱ्यांना वाटावी. गुन्हेस्थळांवर पोहोचण्यासाठी पोलिसांनी दुचाकी व चारचाकी वाहन जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्याचे पालकमंत्र्यांनी निर्देश दिले. अवैध वाहतूक रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन व पोलीस या यंत्रणांनी चोखपणे काम करावे. पोलीस दलाच्या जादूटोणा प्रतिबंधक कायद्याची प्रचार व प्रसिद्धी व अन्य उपक्रमांना निधीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे पोलीस अधीक्षकांना सूचविले.
दोषसिद्धीचा दर ३५ टक्के-कोरोनाकाळात देशात गुन्हे वाढले आहेत. मात्र गतवर्षीच्या तुलनेत खुन, खुनाचा प्रयत्न, बलात्कार यासारख्या गुन्ह्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. २०१९ मध्ये ४३ टक्के, २०२० मध्ये ४,२५३, तर सप्टेंबर २०२१ अखेर ३५ टक्के दोषसिद्धीचा दर असल्याचे आढावा बैठकीत पालकमंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.
डायल ११२ प्रकल्प नियंत्रण कक्षाची पाहणी- बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी पोलीस विभागाच्या डायल ११२ प्रकल्प नियंत्रण कक्षाची पाहणी केली. नियंत्रण कक्ष अत्याधुनिक करणे व गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पथकाला निधी व मनुष्यबळ उपलब्ध करून देऊ. गुन्हेगारांना वचक बसण्यासाठी व गुन्हे दर कमी होण्यासाठी या पथकाची निर्मिती करण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलीस अधीक्षक साळवे यांनी वर्षभरातील कामकाजाचे सादरीकरण केले.