राजुरा : कृषी विभागाने आता महा-डीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोईकरिता सर्व योजनांचा लाभ ‘एकाच अर्जाद्वारे’ देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून, शेतकऱ्यांनी शेतीशी निगडित विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा आहे.
महा-डीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. शेतकरी बांधवानी महा-डीबीटी पोर्टलवर कृषिविषयक योजनांचा लाभ मिळविण्यासाठी अद्याप अर्ज केला नसेल, त्यांनी बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना (विहीर आणि सिंचन सुविधा), बिरसा मुंडा योजना (विहीर आणि सिंचन योजना), प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना (ठिबक सिंचन तुषार सिंचन) या सर्व योजनांसाठी एकाच ठिकाणी अर्ज करता येईल.
अर्ज करण्यासाठी महा-डीबीटी पोर्टलचे संकेतस्थळ आहे. ११ जानेवारी २०२१ अखेरपर्यंत आपले अर्ज पोर्टलवर भरावेत आणि विविध योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे, राजुरा पंचायत समितीच्या सभापती मुमताज जावेद, कोरपना पं. स सभापती रूपाली तोडासे, जिवती पं.स च्या सभापती अंजना पवार यांनी केले.