गुंजेवाही: महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्याच्या माध्यमातून गावातील तंटे गावागावातच सामोपचाराने सोडविले जात असल्याने अनेक गावातील अवैध धंद्यावर आळा बसला आहे. या मोहिमेमुळे परिसरातील गुन्हे मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. या मोहिमेला वृद्धिंगत करण्याचे शासनाचे ध्येय असल्याने तंटामुक्त समित्याचे अध्यक्ष व पदाधिकारी नेहमीच तत्पर असल्याने अनेक गावांचा कायापालट होत आहे. या परिसरात अवैध धंद्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे व्यसनाधिन लोकांचे कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असताना, तरुण मुलेसुद्धा आहारी जात असल्याने त्यांचे भविष्य अंधारात होते. अशावेळी तंटामुक्त समित्यांनी पोलिसांच्या मदतीने पुढाकार घेऊन अवैध दारू विक्रीवर बंदी घातली. अनेक दारू विक्रेत्यांना पकडले व त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याने धास्तावलेले अवैध धंदेधारक आपले अवैध धंदे साडून आपल्या मार्गी लागल्याने गावात शांततेचे वातावरण निर्माण झाले आहेत. या मोहिमेमुळे पोलिसांच्या त्रास कमी झाला आहे. या तंटामुक्त समित्यांच्या माध्यमातून क्षुल्लक कारणावरुन होणारे भांडणे आपसी समन्वयातून हे वाद सोडवीत असल्याने गुन्हे कमी झाले आहेत याच कारणाने तहसील कार्यालय व कोर्टाच्या पायऱ्या पहावयास लागत नाही. ही गावांसाठी कौतुकांची बाब आहे. अनेक तंटामुक्त समित्यांनी आपले गाव सज्ज करुन बक्षिसे मिळविली आहेत. आपल्या गावाचा कायापालट केला आहे. पाथरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद पाटील यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन करुन प्रत्येक गावात पोलीस मित्र तयार केलेत. गावागावांत शांतता प्रस्थापित करुन सरपंच, पोलीस पाटील आणि तंटामुक्त समित्यांचे अध्यक्ष यांच्यात एकोपा तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. हिंदू-मुस्लीम बांधवांच्या सणाच्या काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक समितीने रेकॉर्ड तयार करुन गाव कसे तंटामुक्त होईल यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहनही ठाणेदार अरविंद पाटील यांनी केले आहे. या वर्षात तंटामुक्त समित्यांमुळे गुन्हे व अवैध धंद्यावर आळा बसल्याची माहिती त्यांनी दिली. (वार्ताहर)
तंटामुक्त समितीच्या सतर्कतेने गुन्ह्यात घट
By admin | Published: October 26, 2015 1:15 AM