आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : वनविकास महामंडळाच्या ब्रह्मपुरी विभागीय कार्यालयांतर्गत कार्यरत वनपरिक्षेत्राधिकाऱ्याने आपला लैंगिक व मानसिक छळ केल्याचा आरोप महिला वनरक्षकाने विभागीय व्यवस्थापकांकडे केलेल्या तक्रारीत केला. मात्र न्याय मिळत नसल्याचे पाहून वनविकास महामंडळाचे उत्तर चंद्रपूर महाव्यवस्थापक मुकेश गणात्रा यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी ती तक्रार पुन्हा विभागीय व्यवस्थापकाकडेच वळती करून चौकशीचे आदेश दिले.मात्र ही चौकशी संबंधित वनपरिक्षेत्राधिकाऱ्याच्या पथ्यावर जात असल्याचा आरोप पीडितेने ‘लोकमत’शी बोलताना केल्यामुळे ही चौकशीही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.महाव्यवस्थापक गणात्रा यांना दिलेल्या तक्रारीनुसार, वनपरिक्षेत्र अधिकारी डी. एन. केंद्रे हे लैंगिक व मानसिक छळ करीत असल्याची लेखी तक्रार सदर महिला वनरक्षकाने ९ नोव्हेंबर रोजी सर्वप्रथम विभागीय व्यवस्थापक पी.एस. राजपूत यांच्याकडे केली होती.१५ नोव्हेंबरला विभागीय व्यवस्थापकाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी केंद्रे यांच्याच अधिनस्त चार महिला कर्मचाऱ्यांची चौकशी समिती नेमली. कार्यालयात महिला अधिकारी असतानाही समितीची धुरा कार्यालयातील चपराशी महिलेकडे दिली.समितीने कुठलीही चौकशी न करता वा कुठलाही लेखी अहवाल न देता पुरावे नसल्याच्या सबबीखाली कार्यवाहीस असमर्थता दर्शविली.तसेच बदली करून दुसरीकडे जाण्याचा सल्ला दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यामुळे वनविकास महामंडळात एकच खळबळ उडाली आहे.
महिला वनरक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांची तक्रार प्राप्त झाली. या तक्रारीवर योग्य ती चौकशी करण्याचे निर्देश ब्रह्मपुरी विभागीय व्यवस्थापकांना दिलेले आहेत. चौकशीत सत्य पुढे यईलच. यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.- मुकेश गणात्रा, महाव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ, उत्तर चंद्रपूर.
तीन सदस्यीय महिला समितीमार्फत महिला वनरक्षक व अन्य कर्मचाऱ्यांच्या तक्रारीच्या आधारे चौकशी करण्यात आली. यामध्ये लैंगिक छळ झालेला नाही. तसे पीडिताच्या बयाणातून पुढे आले आहे. मात्र मानसिक छळ झाल्याचे पुढे येत आहे. या आधारे कार्यवाही करण्यात येईल.- पी. एस. राजपूत, विभागीय व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ, ब्रह्मपुरी.
महिला अधिकारी असताना चपराशी असलेल्या महिला कर्मचाऱ्याच्या नेतृत्त्वात चौकशी समिती नेमली. समितीने कोणतीही चौकशी केली नाही. मग महाव्यवस्थापकाकडे न्यायाच्या अपेक्षेने तक्रार केली. त्यांनी परत विभागीय व्यवस्थापकांनाच चौकशीचे निर्देश दिले. यामुळे न्यायाची शाश्वती दिसत नाही. आपल्या बयाणात लैंगिक व मानसिक छळ झाल्याचे म्हटले आहे. चौकशी या दिशेने होताना दिसत नाही.- पीडित वनरक्षक महिला