सुधीर मुनगंटीवार : आपत्ती व्यवस्थापन व अतिवृष्टी नुकसानीचा आढावा चंद्रपूर : गेल्या काही दिवसांपूर्वी सतत कोसळलेल्या पावसामुळे जिल्हयात शेकडो घरांची पडझड झाली आहे. यासह विविध ठिकाणी नुकसान झाले. अशा नुकसानग्रस्तांना तातडीने मदत वाटप करा, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन व अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले, आमदार नाना शामकुळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, मनपा आयुक्त संजय काकडे, अपर जिल्हाधिकारी संजय धिवरे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच बांधकाम, जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीस जिल्हाधिकाऱ्यांनी अतिवृष्टीमुळे घरे, गोठे तसेच इतर नुकसानीची माहिती दिली. ज्यांचे अतिवृष्टीत नुकसान झाले आहे, अशांना तातडीने मदत वितरीत करण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले. यासाठी निधीची आवश्यकता असल्यास तातडीने उपलब्ध करुन देणार असल्याचे ते म्हणाले. तालुकानिहाय नुकसानग्रस्तांच्या याद्या तयार करुन त्यांना आवश्यक ती मदत करा. एकही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. मदतीसाठी नुकसानीचे मूल्यांकन करताना नुकसानग्रस्तांना बऱ्यापैकी मदत मिळेल असे करा. अंशत: घरांचे नुकसान झालेल्यांना किमान तीन हजार २०० रुपये इतकी मदत मिळाली पाहिजे. अगदीच तोकड्या रकमेचे धनादेश देऊ नका. अतिवृष्टीत मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांनाही तातडीने मदत वितरीत करा, असे त्यांनी स्पष्ट केले. अतिवृष्टीत काही भागामध्ये दरवर्षीच नुकसान होत असते. अशा भागांचे सर्वेक्षण करुन ठेवा. आपत्तीची परिस्थिती निर्माण झाल्यास समन्वय व व्यवस्थापन तातडीने करता आले पाहिजे. स्वयंसेवी संस्थाची आपत्तीच्या वेळी चांगली मदत होऊ शकते. त्यामुळे तालुकानिहाय अशा संस्थाची यादी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. (शहर प्रतिनिधी)
अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना तातडीने मदत वाटप करा
By admin | Published: July 16, 2016 1:15 AM