नागभीड : शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाणारी चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँक पुन्हा एकदा कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आली आहे. या बँकेने आतापर्यंत १५ सोसायट्यांच्या माध्यमातून १ हजार ५३६ सभासदांना ७ कोटी ३ लाख ९६ हजार रूपयांचे कर्ज वितरण केले आहे. हे कर्ज वितरण पुढेही सुरू राहणार आहे.
नागभीड तालुक्याचे मुख्य आणि एकमेव पीक धानाचे आहे. याच एका पिकावर या तालुक्याची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. दरवर्षी निसर्गाच्या कोपामुळे तालुक्यातील शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला आहे.शेती करावी की नाही हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असला तरी या शेतकऱ्यांजवळ दुसरा कोणताही उद्योग नसल्याने शेती करण्यावाचून पर्यायही नाही. म्हणून शेतकऱ्यांना नाईलाजाने शेती करावी लागत आहे. मात्र ही शेती करण्यासाठी या शेतकऱ्यांजवळ जमा पुंजी नसल्याने दरवर्षीच वित्तीय संस्थांकडे धाव घ्यावी लागते.
शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्या असे राष्ट्रीयीकृत बँकांना शासनाचे निर्देश असले तरी एक जिल्हा मध्यवर्ती बँक वगळता बहुतेक सर्वच राष्ट्रीयीकृत बँका शासनाच्या या निर्देशास हरताळ फासत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. मात्र जिल्हा मध्यवर्ती बँक पीक कर्ज उपलब्ध करून देऊन नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिली आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक सेवा सहकारी तसेच आदिवासी सोसायट्यांच्या माध्यमातून सभासदांना कर्ज वितरण करीत असते.
बॉक्स
शाखानिहाय कर्ज वितरण
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नागभीड अंतर्गत ३ सहकारी संस्थेच्या वतीने ३२९ सभासदांना १ कोटी ६२ लाख २७ हजार रुपये, तळोधी शाखेतंर्गत ८ सहकारी संस्थेच्या वतीने ८२० सभासदांना ३ कोटी ७७ लाख २२ हजार रूपये, नवेगाव पांडव शाखेच्या वतीने २ सहकारी संस्थांच्या माध्यमातून १३२ सभासदांना ५४ लाख १३ हजार रूपये, पाहार्णी शाखेतंर्गत २ सहकारी संस्थांच्या माध्यमातून २५५ सभासदांना १ कोटी १० लाख ३४ हजार रुपये असे एकूण ७ कोटी ३ लाख ९६ हजार रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. आतापर्यंत १५ सोसायट्यांनीच कर्ज वितरण केले आहे.आणखी १५ सोसायट्यांची कर्ज वितरण प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे.