लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयातील कंत्राटी कामगारांना किमान वेतन देण्यात यावे, या मागणीसाठी २ मार्चपासून कामगारांनी आंदोलन पुकारले. मागील चार दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केले. अखेर त्यांच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली असून कामगारांच्या वेतनामध्ये जवळपास दुपटीने वाढ करण्याचे शासकीय आदेश धडकले. शासनाच्या आदेशाचे प्रत पाहिल्यानंतर कामगारांनी बेमुदत उपोषण मागे घेतले.जन विकास सेना संलग्नित जन विकास कामगार संघाच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू होते. किमान वेतन व चार महिन्यांचा थकित पगार देण्यात यावा, या मागणीवर कामगार ठाम होते. आधी बेमुदत कामबंद आंदोलन, त्यानंतर धरणे आंदोलन आणि ११ मार्चपासून पप्पु देशमुख यांच्या नेतृत्वात कामगारांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शिष्टमंडळाने उपोषण मंडपाला भेट देऊन किमान वेतनाला मंजुरी देणाऱ्या शासन आदेशाची प्रत दिली. ८ मार्चच्या तारखेत निघालेला हा शासन आदेश बुधवारी १३ मार्च रोजी चंद्रपूरच्या अधिष्ठाता कार्यालयाला प्राप्त झाला. केवळ चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कामगारांना किमान वेतन देण्याकरिता अतिरिक्त निधीला मंजुरी देण्यातकरिता हा आदेश काढण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी या सर्व मागण्यांबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मोरे यांच्याशी चर्चा करून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुरूवारी शिष्टमंडळाने उपोषणकर्त्यांना शरबत पाजले व उपोषणाची सांगता झाली. यावेळी जनविकासचे अध्यक्ष पप्पू देशमुख, सरचिटणीस गुरुदास कामडी, सचिव सतीश खोबरागडे, ज्योती कांबळे, रेश्मा शेख आदींची उपस्थिती होती.
कामगारांच्या वेतनामध्ये जवळपास दुपटीने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:39 AM
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयातील कंत्राटी कामगारांना किमान वेतन देण्यात यावे, या मागणीसाठी २ मार्चपासून कामगारांनी आंदोलन पुकारले. मागील चार दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केले.
ठळक मुद्देतातडीचे शासन आदेश : चवथ्या दिवशी बेमुदत उपोषण मागे