पिंपळगाव (भो) : मानवी आयुष्यात आंब्याला अनन्यसाधारण महत्व आहे. परंतु अलिकडे आंब्याची झाडे सर्रास तोडली जात असल्याने गावागावातील अमराई नामशेष होत चालल्या आहेत. त्याचा परिणाम पर्यावरणावर होऊ लागला आहे. या आम्रवृक्ष तोडीवर त्वरित प्रतिबंध घालावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.उन्हाळ्यात जर ऊन लागले असेल, शरिरात उष्णता वाढली असेल तर आंबा अतिशय गुणकारी ठरतो. यामुळे शरिरातील उष्णता कमी होते. आंब्याचा रस व गव्हाच्या शेवया या तर ग्रामीण भागातील शेतकऱ्याजवळचा पसंतीचा आहार असतो. ग्रामीण भागात आंब्याच्या रसासोबत शेवया खाण्याची पद्धत आहे. आंब्याचे लोणचे ताप आलेल्या रुग्णाच्या तोंडाला चव येण्यासाठी, तोंडातील कडूपणा जाण्यासाठी ज्वारीची आंबील (कंजी) सोबत चाकायला देतात. एकूणच आंबा दैनंदिन आयुष्यात महत्त्वाचा घटक आहे.आंब्याचे झाड इतर झाडापेक्षा उंच, विस्ताराने मोठे असते. उन्हात प्रवास करणाऱ्या वाटसरूंना उन्हाचे चटके कमी करण्यासाठी आंब्याच्या सावलीचा मोठा उपयोग होतो. आंब्याचे झाड उंच असल्याने पावसासाठीही याचा फायदा होतो. हवेने, वादळाने हे झाडे पडले तर त्याच्या लाकडाचा सरपणासाठी वापर केला जातो. सद्यस्थितीत काही दलाल ही आंब्याची झाडे घेत आहेत. अज्ञानी, निरक्षर शेतकऱ्यांना जादा पैशाचे आमिष दाखवून आंब्याच्या अमरायाच मुळापासून तोडून नष्ट करीत आहेत. आज शासन गाव तिथे रस्ता व रस्ता तिथे झाडे लावण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करीत आहे व निसर्गाचे संतुलन राखण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु महसूल विभागच दलालांना आंब्याचे झाडे तोडण्यासाठी परवानगी देत असल्याची खंत नागरिक बोलून दाखवित आहेत. कोट्यवधींचा खर्च होऊनही पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. अलिकडे दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी महत्त्वाचा असलेल्या फळाचा राजा आंब्याची होत असलेली कत्तल थांबवून तोडणाऱ्यावर व तोडण्याची परवानगी देणाऱ्या विभागावर कारवाई का होऊ नये. वृक्ष तोडलेच तर त्याच जागेवर नवीन आंब्याचे झाडे लावण्याची सक्ती का करू नये, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. (वार्ताहर)
आमराई लुप्त होण्याच्या मार्गावर
By admin | Published: April 10, 2015 12:54 AM