लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : माजी पोलिस अधिकारी सुधाकर कुंडलिक अंभोरे यांनी सोमवारी मुंबईत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायिक राहुल निरंजन तायडे यांनीही प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने चंद्रपुरातील राजकारणात नव्या राजकीय घडमोडींचा उदय झाल्याचे बोलले जात आहे.
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. सुधाकर अंभोरे हे अनुसूचित जाती प्रवर्गातीलच आहे. चंद्रपुरात काँग्रेसकडे दमदार चेहरा नसल्याची कुजबूज सुरू होती. अंभोरे यांच्या प्रवेशामागे आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती असल्याची चर्चा आहे. पोलिस प्रशासनातून सेवानिवृत्त झाल्यापासून सुधाकर अंभोरे हे चंद्रपुरातच वास्तव्यास आहे. काँग्रेसच्या मंडळींकडूनही अधूनमधून अंभोरे यांच्या नावाची चर्चा होत होती.
काँग्रेसपक्ष चंद्रपूर विधानसभा मतदारसंघासाठी दमदार उमदेवाराची चाचपणी करीत आहे. मागील दहा वर्षांत चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्ष कधी नव्हे एवढा मागासला आहे. हे मागासलेपण दूर करण्यासाठी काँग्रेस पक्षात डॉ. दिलीप कांबळे आणि सुधाकर अंभोरे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. अखेर अंभोरे यांचा काँग्रेस प्रवेश झाल्याने ही नव्या राजकीय घडमोडींची चाहूल असल्याचे बोलले जात आहे. पक्ष प्रवेशाच्यावेळी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे उपस्थित होते.