रवी जवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : रुग्णवाहिका ही सेवा समजली जाते. ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर खासगी रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देणे बंधनकारक असतानाच अशी बंधने फारशी पाळली जात नसल्याचे दिसून येत आहे. जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल, याकडेच रुग्णवाहिका उपलब्ध करून देणाऱ्यांचे लक्ष लागल्याचे दिसून येत आहे. शासनाने खासगी रुग्णवाहिकांसाठी कुठलेही दर निश्चित केले नाही. त्यामुळे रुग्णवाहिकेच्या चालकांनी सेवाभाव बाजुला सारुन रुग्णवाहिकेची दुकानदारी सुरू केली आहे. घरच्या सदस्याच्या आजारपणामुळे हतबल झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांचा वाट्टेल तसा फायदा घेत त्यांची रुग्णवाहिकांचे चालक लूट करीत असल्याचे लोकमतच्या पाहणीत आढळून आले आहे.चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा आहे. याशिवाय जंगली परिसरही मोठा आहे. त्यामुळे अपघात, वन्यप्राणी हल्ल्यांच्या घटना सातत्याने घडत असतात. त्यामुळे अनेक जणांना शासकीय वा खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते. अशावेळी त्यांना रुग्णवाहिकेचा मोठा आधार असतो. मात्र सेवेच्या नावावर सुरू करण्यात आलेला रुग्णवाहिकेचा व्यवसाय चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार फोफावला आहे. अमर्याद कमाईमुळे अनेक जण या व्यवसायात उतरत असतानाच गरीब रुग्णांची मात्र परवड होत आहे. चंद्रपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह शेकडो नर्सिग होम आहेत. याशिवाय ३० ते ३५ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहेत. या रुग्णालयात उपचारासाठी जिल्हाभरातून व बाहेर जिल्ह्यातूनही रुग्ण मोठ्या संख्येने येतात. रुग्णालयातून रुग्णाला सुटी झाल्यानंतर किंवा दुसºया रुग्णालयात हलवायचे झाल्यास किंवा दुर्देवाने रुग्णाचा मृत्यू झाल्यास मृतदेह घरी नेण्यासाठी रुग्णवाहिकेची मदत घ्यावी लागते. अशावेळी रुग्णाच्या अडचणीचा फायदा घेऊन त्याची अक्षरश: लूट केली जाते. पूर्वी असे घडत नव्हते. कारण काही सामाजिक संस्था व मोजके हॉस्पिटलच अशी सेवा देत होते. परंतु आता खासगी रुग्णालयासह विविध संस्था, राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या धंद्यात शिरकाव केला आहे. त्यांच्यात कमाईसाठी सुरू असलेल्या स्पर्धेमुळे या सेवेचे बाजारीकरण झाले आहे. याचा फटका मात्र आधीच रुग्णाच्या आजारपणामुळे हतबल झालेल्या रुग्णाच्या कुटुंबीयांना बसत आहे.अनेक रुग्णवाहिकांची नोंदच नाहीरुग्णवाहिका घेतल्यानंतर तिची पासींग होतानाच रुग्णवाहिका म्हणून आरटीओ कार्यालयात नोंद होते. मात्र काही जणांनी आधी ओमनीसारखी वाहने घेतली आहेत. नंतर पुढे त्यांना रुग्णवाहिका करुन व्यवसाय सुरू केला आहे. त्यांची वाहन म्हणून नोंदणी असली तर रुग्णवाहिका म्हणून नोंद नाही. अशा अनेक रुग्णवाहिका जिल्ह्यात धावत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, रुग्णवाहिका असल्याने त्यांना रस्त्यावर तपासलेही जात नाही. याचाच फायदा ते घेत आहेत.१०८ चे खासगी रुग्णवाहिकाचालकांसोबत साटेलोटे१०८ क्रमांक लावताच तत्काळ रुग्णाला रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका चालकाचे खासगी रुग्णवाहिका चालकांसोबत घनिष्ठ संबंध असतात. एखाद्या रुग्णाच्या नातेवाईकांनी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका बोलावली की तो आपण इतर गावी असल्याचे सांगत खासगी रुग्णवाहिका चालकाचा भ्रमणध्वनी देतो. नंतर हा चालक रुग्णाच्या नातेवाईकांकडून वाट्टले तेवढे पैसे उकळतो. असा अनुभव अनेकदा चंद्रपूर येथील नागरिकांना आला आहे.तातडीच्या सेवेतला महत्त्वाचा घटकतातडीच्या सेवेत रुग्णवाहिका महत्त्वाचा घटक आहे. रुग्णवाहिकेमध्ये रुग्ण टाकताच पैशाचा हिशोब सुरू होतो. काही रुग्णवाहिका तर तीन ते चार कि.मी. अंतराचे १००० ते १५०० रुपये घेतात. मेडीकल कॉलेजपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खासगी दवाखान्यात रुग्ण नेण्यासाठी चक्क ८०० रुपये एका रुग्णवाहिकेच्या चालकाने रुग्णाच्या नातेवाईकांना मागितल्याचे ‘लोकमत’ला पाहणीत आढळून आले. दवाखाना परिसरात असलेल्या रुग्णवाहिकेच्या चालकांचा रुग्णापेक्षा रुग्णाच्या मृत्यूचीच प्रतीक्षा असते. सावजाचा शोध घेत शिकारी जसा सावज शोधत असतो त्याचप्रमाणे चालकांची नजरही कोणत्या रुग्णाचा मृत्यू होईल, यावर असते. कुठल्या वॉर्डात किती रुग्ण आहेत, जळालेल्या वॉर्डात दाखल असलेल्या रुग्णाची प्रकृती कशी आहे, याची इत्यंभूत माहिती त्यांच्याकडे असते. रुग्णाचा मृत्यू झाल्यास आपल्यालाच धंदा मिळावा यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांशी जवळीक साधली जाते. रुग्णवाहिका चालकांचे काही एजंट रुग्णालय परिसरात फिरत असतात. या सर्व रुग्णवाहिका जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मागच्या बाजुला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वसतिगृहासमोर उभ्या असल्याचे दररोज दिसून येते. एकदा रुग्ण जाळ्यात अडकला की, त्याची पिळवणूक सुरू होते.
जिल्ह्यात रुग्णवाहिकांची दुकानदारी तेजीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 6:00 AM
चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा आहे. याशिवाय जंगली परिसरही मोठा आहे. त्यामुळे अपघात, वन्यप्राणी हल्ल्यांच्या घटना सातत्याने घडत असतात. त्यामुळे अनेक जणांना शासकीय वा खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते. अशावेळी त्यांना रुग्णवाहिकेचा मोठा आधार असतो. मात्र सेवेच्या नावावर सुरू करण्यात आलेला रुग्णवाहिकेचा व्यवसाय चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार फोफावला आहे.
ठळक मुद्देसेवाभाव गेला कुठे ? : रुग्णाच्या अगतिक कुटुंबीयांची चालकांकडून लूट, संवेदनशिलता हरविली पैशात