रात्री तिच्या अंगाला हळद लागली. दुसऱ्याच दिवशी तिचा विवाह होणार असल्याने ती भावी आयुष्यातील सोनेरी स्वप्नांत जणू हरवूनच गेली होती. काही तासांनंतर येणाऱ्या अडचणीच्या वेळेची तिला कल्पनाच नसावी..?? पहाटे साडेचार ते पाच वाजताच्या दरम्यान अचानक तिची तब्बेत बिघडली, आणि तिला चंद्रपुर च्या खाजगी दवाखाण्यात हलवावे लागले. तिथूनही तिला नागपूर ला घेऊन जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याने तिला रूग्णवाहीकेत टाकुन नागपूर च्या दिशेने तिचा प्रवास सुरू झाला. तिला घेऊन जाणारी रूग्णवाहिका जेमतेम वरोऱ्या पर्यंत पोहचली आणी.... *
पोंभूर्ण्यापासुन ७ किमी. अंतरावर असलेल्या चिंतलधाबा येथिल भुजंगराव सोयाम यांची मुलगी वैशाली हिचा विवाह गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथिल सेवानिवृत्त शिक्षक दलपतराव आत्राम यांचा मुलगा गणेश यांच्याशी ९ मे रोजी होण्याचा मुहूर्त ठरला होता. आदल्या रात्री तिला " नवरी " करण्यात आले होते. सकाळी अचानक वैशाली ची प्रकुर्ती खालावली आणि तिला चंद्रपुर च्या खाजगी रूग्णालयात भरती करण्यात आले. नवऱ्यामुलीची प्रकुर्ती खालावल्याचा निरोप वर पक्षाकडील मंडळींनाही देण्यात आला. वर पक्षाकडील मंडळी ताबडतोब चिंतलधाब्यात दाखल झाली. वर पक्षाकडील मंडळीना भलत्याच शंकेने घेरले गेल्याचे एेकीवात आले आहे.
प्रत्यक्षदर्शी गांवकरी मंडळी व पाहुणे मंडळी कडून मिळालेल्या माहीती प्रमाने वर पक्षाकडील मंडळीना वधुमुलगी एखाद्या प्रियकरासोबत पळून गेली असावी, असा संशय आला होता. त्यामुळे - मुलीच्या आई - वडिलाने चार दिवसानंतर लग्न लावण्याची विनंती करूनही वर पक्षाकडिल लोकांनी वैशाली च्या आई - वडिलांची विनंती धुडकावून लावली. लग्न लावायचे असेल, तर आजच..!! असा हेका धरला. तब्बेत खराब असेल तर बोलवा, लग्न लाऊन परत दवाखाण्यात नेता येईल असा संशयास्पद सल्ला ही वर पक्षाकडून देण्यात आला.
नवरदेवाची वरात चिंतलधाब्यात दाखल झाली होती. मुलीकडील मंडळी नवरदेवासह त्याच्या कडील मंडळींना समजावण्याचा प्रयत्न करीत होती, परंतु नवरदेवाकडील मंडळी चार दिवसानंतर लग्न लावण्याच्या मानसिकतेत नसल्याचे गांवकऱ्यांकडून सांगण्यात आले. शेवटी वरोऱ्या पर्यंत पोहोचलेल्या वैशाली ला रूग्णवाहीकेसह वापस बोलाविण्याचा निर्णय घेण्यात आला. रूग्णवाहिका वैशाली ला घेऊन थेट लग्न मंडपात दाखल झाली. नवरी मुलगी सलाईन सह रूग्णवाहीकेत, व नवरदेव रूग्णवाहिकेच्या बाजुला उभा करून शेकडो वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत मंगलाष्टकांसह हा अनोखा विवाह सोहळा पार पडला. आज ही गांवा - गांवात ह्या विवाहाची चर्चा सुरू होती...