चंद्रपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. रुग्णांना बेड मिळणेही कठीण झाले आहे. अशावेळी जो तो रुग्णवाहिकेची मागणी करीत होता. मात्र, पैसा असूनही रुग्णवाहिका मिळत नसल्याचे चित्र होते. त्यामुळे येथील नटराज डान्स इन्स्टिट्यूटचे अब्दुल जावेद यांनी पुढाकार घेत जनता रुग्णवाहिका सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी नागरिकांकडून पैसा गोळा करून त्यांनी नवीन रुग्णवाहिका खरेदी केली. तिचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले आहे.
जनता रुग्णवाहिकेला मदत करण्याचे आवाहन सोशल मीडियावर करण्यात आले. त्यानंतर एकेक करीत २९४ नागरिकांनी यासाठी निधी दिली. विशेष म्हणजे, डेबू वृद्धाश्रमचे संचालक सुभाष शिंदे यांनी दीड लाखाची मदत केली. त्यामुळे रुग्णवाहिका घेणे शक्य झाले असून, आता गरजूंना डिझेल भरून रुग्णवाहिका नेता येणार आहे. या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी डेबू वृद्धाश्रमचे संचालक सुभाष शिंदे, इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे, नेत्रा इंगुलावर, अलका गुरुवाले, आशिष देव, भारती शिंदे, पूनम झा, मृणालिनी खाडिलकर, प्रशांत कत्तुरवार, अमित विश्वास, विमल शाह, रवी बन्सोड आदींची उपस्थिती होती.