राजकुमार चुनारकर
चिमूर : शासनाने शालेय विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराऐवजी रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यासंदर्भात परिपत्रक काढले आहे. त्यानुसार शिक्षण संचालक यांनी महाराष्ट्रातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. उन्हाळ्यातील सुटीच्या व कोरोना कालावधीतील पोषण आहाराची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अनेक विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडलेले नाहीत. आधार लिंक करण्यात आले नाही. खात्यात व्यवहार नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे खाते बंद पडले आहे. अशा परिस्थितीत पोषण आहाराची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात अडचणी येणार आहेत. सध्या शेतीविषयक कामे सुरू आहेत. पालकांना शेतीची कामे सोडून बँकेत चकरा मारणे परवडण्यासारखे नाही. बँकेत गेल्याबरोबर बँकेतील काम होत नाही. परिणामी पालक त्रासून पाल्यांचे खाते काढण्याकडे कानाडोळा करीत असल्याचा अनुभव शिक्षकांना येत आहे. पोषण आहाराची रक्कम खूप जास्त नसणार आहे. त्यामुळेही पालक शिक्षकांवरच दोषारोपण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोना पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना धान्य शाळेत मिळत होते. परंतु नवीन परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना थेट रक्कम खात्यात जमा करण्याच्या निर्णयामुळे व विद्यार्थ्यांच्या खात्यांमुळे ही योजना रेंगाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उन्हाळी सुट्यातील पोषण आहाराचे दिवस लक्षात घेता विद्यार्थ्यांना मिळणारी रक्कम खूप मोठी नाही. त्यामुळेही या योजनेवर प्रश्नचिन्ह लागण्याची शक्यताच अधिक आहे.
कोट
शालेय पोषण आहारातील रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या शासन निर्णयाला विद्यार्थ्यांचे खाते परिपूर्ण नसल्याने अडचणी येणार आहेत. पालक बँकांच्या नियमांना कंटाळून मुलांचे खाते काढायला त्रासून जातात. शिक्षकांना वारंवार यासंदर्भाने प्रशासनाकडून विचारणा होत असते. शासनाने बँकांना पत्र देऊन विद्यार्थ्यांचे खाते काढण्यासंदर्भात मदत करण्याच्या सूचना कराव्यात.
- सुरेश डांगे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती, चंद्रपूर जिल्हा