लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या प्रकोपामुळे मुहूर्तावर लग्न करणे अशक्य असल्याचे लक्षात येताच येथील आयएफएस (भारतीय वन सेवा) अधिकारी राहुल पाटील व त्यांच्या भावी वधू तेजस्विनी साळुंखे यांनी लग्नाच्या खर्चासाठी ठेवलेली १ लाख रुपयांची रक्कम लग्नाच्या मुहूर्ताच्या दिवशी शनिवार दि. २ मे रोजी मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.राहुल पाटील हे तरुण अधिकारी चंद्रपूर येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक म्हणून कर्तव्य बजावत आहेत. ते मूळचे सांगली जिल्ह्यातील आहे. लॉकडाऊनपूर्वीच त्यांचा विवाह सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील किवळ येथील तेजस्विनी साळुंखे यांच्याशी जुळला. तेजस्विनीचे शिक्षण एमबीए झालेले असून त्या वन अंब्रेला नावाने मुंबईमध्ये इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करीत आहेत. दरम्यान त्यांचा साक्षगंधही थाटात पार पडला. २ मे ही लग्नाची तारीख निश्चित झाली. लग्नाची तयारी सुरू असतानाच जगावर कोरोनाचे संकट आले. भारतातही कोरोनाचा शिरकाव झाला. यावर मात करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने लॉकडाऊनची घोषणा केल्याने सर्वकाही एकाएकी ठप्प झाले. याचा फटका लग्न सोहळ्यांनाही बसला. अनेकांना आपले लग्न आटोपते घ्यावे लागत आहे. राहुल पाटील यांच्याही लग्नाला ही अडचण आली. ते चंद्रपुरात आणि त्यांची भावी वधू ही सातारा जिल्ह्यातील. यामुळे त्यांना २ मे च्या मुहूर्तावर लग्न करता येणे अशक्य आहे. हे लक्षात येताच त्यांनी सामाजिक बांधिलकी जपायचे ठरवले. वास्तविक, लॉकडाऊनमध्ये या दोघांनी सांगली व सातारा जिल्ह्यामध्ये स्वराज्य फाउंडेशन व माई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मास्कसह सुमारे ७०० लीटर सॅनिटीएझर व ७ हजार मास्कचे वितरण केले हे विशेष. तसेच बांबूवर आधारित रोजगार करणाऱ्या लोकांना आर्थिक झळ बसू नये म्हणून राहुल पाटील यांनी चंद्रपूरमध्ये ‘वर्क फ्रोम होम फॉर बांबू’ ही कल्पना राबवली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी लग्नाच्या पहिल्या मुहूर्ताची आठवण राहावी म्हणून स्वत: आणि त्यांच्या भावी वधू यांनी प्रत्येकी ५० हजार रुपये असे एक लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही आज २ मे रोजी ही रक्कम नेटबँकिंगच्या आधारे मुख्यमंत्री सहायता निधीच्या खात्यात जमा करून समाजापुढे नवा आदर्श ठेवला. प्रत्येक नव वरवधूने किमान एक हजार रुपये जरी मुख्यमंत्री सहायता निधीला दिल्यास याची राज्याला मोठी मदत होईल, असे असे राहुल पाटील व त्यांच्या भावी वधू तेजस्विनी साळुंखे यांचे म्हणणे आहे.
लग्नाच्या खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2020 8:20 PM
आयएफएस (भारतीय वन सेवा) अधिकारी राहुल पाटील व त्यांच्या भावी वधू तेजस्विनी साळुंखे यांनी लग्नाच्या खर्चासाठी ठेवलेली १ लाख रुपयांची रक्कम लग्नाच्या मुहूर्ताच्या दिवशी शनिवार दि. २ मे रोजी मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
ठळक मुद्देआयएफएस राहुल पाटील व त्यांच्या भावी वधूने दिला नवा संदेश