साईनाथ कुचनकार, चंद्रपूर: चंद्रपुरात पार पडलेल्या ‘आमदार चषक’ राज्यस्तरीय आमंत्रित हॉकी स्पर्धेत मुलींच्या गटात अंतिम सामन्यात नागपूर संघाचा ३-१ने पराभव करीत अमरावती संघाने बाजी मारली.
हॉकी प्रमोटर असोसिएशन चंद्रपूर व डेव्हलपमेंट अँड रिसर्च एज्युकेशन सोसायटी (ड्रिम) चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने राज्यस्तरीय आमंत्रित हॉकी स्पर्धा (मुली) लोकमान्य टिळक हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, जिल्हा स्टेडियमच्या बाजूला चंद्रपूर येथे पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून मुलींचे संघ सहभागी झाले होते.
मुलींच्या गटात नागपूर आणि अमरावती संघात अंतिम सामना रंगला. चुरशीच्या सामन्यात अमरावती संघाने नागपूर संघाचा ३-१ने पराभव केला. तिसऱ्या स्थानासाठी चंद्रपूर-यवतमाळ संघात सामना झाला. यात चंद्रपूर संघाने बाजी मारली. मुलींच्या गटात प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्या संघाला ट्राॅफी, रोख आणि मेडल देऊन आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बेस्ट स्कोरर, बेस्ट किपर, बेस्ट फॉरवर्ड, बेस्ट डिपेंडर, बेस्ट प्लेअर ऑफ फायनल मॅच, बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून खेळाडूंना गौरविण्यात आले.
बक्षिस वितरण कार्यक्रमाला अरविंद दीक्षित, सुरेंद्र अडबाले, प्रा. रवी झाडे, दिनकर अडबाले, सचिन मोहीतकर, प्रेम गावंडे, रूपेशसिंह चव्हाण, अभिजित दुर्गे, नीलेश शेंडे, पंकज शेंडे आदींची उपस्थिती होती.