चंद्रपूर महानगर पालिकातर्फे आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महापौर राखी कंचर्लावार होत्या. प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, माजी महापौर अंजली घोटेकर, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, सभागृह नेते संदीप आवारी, नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, झोन सभापती राहुल घोटेकर, अंकुश सावसागडे, संगीता खांडेकर, शिवसेना गटनेते सुरेश पचारे, सर्व मनपा सभापती, नगरसेवक यांची मंचावर उपस्थिती होती.
आ. मुनगंटीवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी केंद्रात सत्ता आल्यानंतर देशात, गाव असेल की शहर प्रत्येक घरी नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचविण्याचा संकल्प केला होता. त्यादृष्टीने देशात अमृत योजना सुरू झाली. या राज्याचा अर्थमंत्री असताना महानगरपालिकेच्या अनुदानात वाढ केली. त्यामुळे मनपाला या अमृत योजनेसाठी आवश्यक खर्च करता आला. सत्ता महत्त्वाची नसून सत्य महत्त्वाचे आहे. या योजनेत केंद्र सरकारला ५० टक्के, राज्य शासनाला २५ टक्के निधी द्यायचा असतो. उर्वरित २५ टक्के निधी मनपाने द्यायचा असतो. पण राज्यातील काही मनपा हा खर्च उचलण्यास असमर्थ होत्या तेव्हा अर्थमंत्री म्हणून पहिली नस्तीवर सही केली. जीएसटीनंतर ८ टक्के दरवर्षी अनुदानात वाढ केली म्हणून ही योजना आज पूर्णत्वास येत आहे, अशी माहिती यावेळी आमदार मुनगंटीवार यांनी दिली. चंद्रपूरकरांना कोरोना लसीचा तुटवडा होऊ नये म्हणून केंद्रीय मंत्र्यांशी संपर्क केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मुक्ती फाउंडेशनच्या मंजुश्री कासनगोट्टूवार व प्राचार्य प्रज्ञा बोरगमवार यांनी संयुक्तपणे तयार केलेले एक जलकुंभाचे हस्तशिल्प आ. मुनगंटीवार यांना स्मृतिचिन्ह म्हणून भेट देण्यात आले. यावेळी हंसराज अहीर, राखी कंचर्लावार यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. नगरसेवक सोपान वायकर यांनी आभार मानले.