चंद्रपूर : येथील जगविख्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कधीकधी अनपेक्षित किस्से घडतात. यापूर्वी एक गवा वाघाचा पाठलाग करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. नंतर वाघाने त्या गव्याची शिकार केली हा भाग वेगळा. मंगळवारी पुन्हा एक असाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत वाघाचा पाठलाग करणारा गवा नसून अस्वल आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. मंगळवारी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारी बंद असते. यामुळे तो बफरमधील असावा, अशी पुष्टी ताडोबातील एका अधिकाऱ्याने केली आहे.या व्हिडिओमध्ये एक वाघ अस्वलीसमोर येतो. वाघ त्या अस्वलाच्या दिशेने जातील असे वाटत असले तरी येथे मात्र उलट घडते. वाघाने अस्वलाचा मार्ग अडवलेला दिसतो. यामुळे संतप्त झालेले अस्वल वाघाचा पाठलाग करताना दिसते. वाघ मात्र धूम ठोकून पळून जातो. पुन्हा हाच प्रसंग पाठलाग करताना दिसतो. या अनपेक्षित दृश्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. अस्वल अंगावर येताच पळून जाणारा वाघ हा टी-१९ असल्याचे बोलले जात आहे.