घुग्घुस (चंद्रपूर) : घुग्घुस अमराही परिसरातील एक घर शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास शंभर फूट जमिनीत गेल्यानंतर परत त्या परिसरातील चार घरांच्या भिंतीला तडे गेले. त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने तत्काळ तेथील ५३ कुटुंबांना इतरत्र हलविले आहे. त्या परिसरात पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला असून, परिसर सील केला आहे.
या परिसरात चार दशकांपूर्वी भूमिगत कोळसा खाणीतून कोळसा ब्लास्टिंग करून काढण्यात आला होता. कोळसा उत्खननासाठी वेकोलिने अधिक क्षमतेची ब्लास्टिंग करून कमी वेळेत अधिक कोळसा उत्पादन असे लक्ष साधून कोळसा उत्पादन केले. मात्र, ती भूमिगत खाण कोळसा काढल्यानंतर व्यवस्थित बुजविण्यात आली नाही. त्यानंतर अनेक वेळा भूकंपासारखे धक्के या परिसरात बसले. भिंतींना तेव्हाही तडे गेले. मात्र, नागरिकांच्या तक्रारीनंतरही वेकोलि आणि जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही.
रिकाम्या क्वाॅर्टरमध्ये तात्पुरती व्यवस्था
यावर्षी पाऊस भरपूर पडल्याने जमिनीत पाणी मुरले व त्यातूनच शुक्रवारी सायंकाळी अमराही वाॅर्डातील गजानन मडावी यांचे घर शंभर फूट जमिनीत गडप झाले. ते मागील २५ वर्षांपासून येथे वास्तव्यास आहेत. सुदैवाने घरात कुणीही नसल्याने जीवितहानी टळली. शनिवारी त्याच परिसरातील चार घराच्या भिंतीला तडे गेल्याने सर्वत्र दहशत पसरली आहे. प्रशासनाने दखल घेत ५३ कुटुंबांना घरातून इतरत्र हलवून त्या परिवाराची तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली आहे. पुनर्वसनाची सोय होईपर्यत वेकोलिने आपल्याच रिकाम्या असलेल्या क्वाॅर्टरमध्ये या कुटुंबाची राहण्याची व्यवस्था करण्याची सूचना केली आहे. वणी क्षेत्राचे मुख्य महाव्यवस्थापक आभाससिंग यांनी शनिवारी या परिसराला भेट देऊन पाहणी केली.