राजेश भोजेकर/चंद्रपूर: खेळाडूंना उत्तमोत्तम सुविधा मिळाव्या आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून चंद्रपूर जिल्ह्याची मान अभिमानाने उंच करावी, यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार कायम प्रयत्नशील असतात. याच प्रयत्नांचा भाग म्हणून आता चंद्रपुरात सर्व सोयीसुविधायुक्त असा वातानुकूलित बॅडमिंटन हॉल उभारण्यासाठी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी ५ कोटी ३९ लक्ष रुपये मंजूर केले आहेत.
नागपूरच्या विभागीय क्रीडा संकुलानंतर विभागातील दुसरा वातानुकुलित बॅडमिंटन हॉल चंद्रपुरात होणार आहे. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून ऑक्टोबर महिन्यात चंद्रपूर येथे सिनीयर राज्यस्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप आयोजित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा प्रथमच चंद्रपुरात होणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण राज्यातून बॅडमिंटनचे खेळाडू चंद्रपूर येथे स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे अद्ययावत बॅडमिंटन हॉलचा आराखडा तयार करून हॉलमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसविणे, प्रकाशझोताची व्यवस्था करणे, आसन व्यवस्था, अद्यावत प्रसाधने, वुडन फ्लोरिंग, वोवाकोट सिंथेटिक, सोलर सिस्टिम, एकॉस्टिक सिस्टीम, पब्लिक एड्रेस सिस्टीम, ड्रिंकिंग वॉटर सिस्टीम इत्यादी सुविधेचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
खेळाडूंमध्ये आनंद
बॅडमिंटन हॉलसाठी क्रीडांगण विकास योजनेतून ५ कोटी ३९ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. बॅडमिंटन हॉलचे काम दर्जेदार करण्याच्या सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी क्रीडा विभागाला दिल्या आहेत. भविष्यात याठिकाणी बॅडमिंटनसह विविध क्रीडाप्रकार खेळले जाणार असल्याने खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जलतरण तलाव लवकरच
यापूर्वी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथील जिल्हा क्रीडा संकुलात जलतरण तलावासाठी नाविण्यपूर्ण योजनेतून १ कोटी ५० लक्ष रुपये मंजूर केले आहेत. त्याचे काम प्रगतीपथावर आहे. तर जिल्हा क्रीडा संकूल येथे सिंथेटिक ट्रॅकसाठी १२ कोटी रुपये आणि वॉकिंग ट्रॅकसाठी ५१ लक्ष रुपये उपलब्ध करून दिले आहेत.