प्रवीण खिरटकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा: कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी आनंदवनला जिल्हा प्रशासनाने सील केले. याच आवारात बँकेची शाखा आहे. या इमारतीपासून बँकेचे कर्मचारी आंदवन प्रवेशद्वारावर येतात आणि ग्राहकांचे काम घेवून जातात. त्यानंतर काही वेळाने रक्कम अथवा संबंधित दस्ताऐवज परत आणून देण्याचा उपक्रम बँकेने सुरू केला आहे.आनंदवनात कर्मयोगी बाबा आमटे यांचे कार्य तिसऱ्या पिढीने जोमाने सुरु ठेवले. त्यामुळे समाजसेवेचे कार्य बघण्याकरिता देश- विदेशातील पर्यटक येतात. उन्हाळ्यात पर्यटकांची संख्या अधिक असते. सध्या कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातले आहे. त्याचा प्रादूर्भाव होऊ नये, याकरिता जिल्हा प्रशासनाने आनंदवन परिसर सील केले. आनंदवनातील लोकोपयोगी उद्योग व दैनंदीन कामे सुरु आहेत. परंतु कुणालाही प्रवेश नाही. आनंदवनाच्या परिसरात बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा आहे. या शाखेत शेकडो खातेदार आहेत.मात्र, ग्राहकांना बँकेपर्यंत जाता येत नाही. त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्र शाखेने अनोखा उपक्रम सुरू केला. ग्राहक बँकेच्या वेळात आनंदवनच्या प्रवेशद्वारावर येतात त्यावेळी बँकेचे कर्मचारी ग्राहकांचे विड्राल, धनादेश, पासबुक व रक्कम जमा करण्यासाठी स्लीप उपलब्ध करुन देतात.संबंधित कर्मचारी बँकेत घेवून जातात. त्यानंतर आनंदवनाच्या प्रवेशद्वारावर ग्राहकांना सदर रक्कम पोहचवून देण्याचे काम एक महिन्यापासून सुरु आहे.
ग्राहक समाधानीग्राहक व कर्मचाऱ्यांमध्ये सुसंवाद व विश्वासामध्ये वाढ होत असल्याने हे कार्य अविरतपणे सुरू आहे. यामध्ये ग्राहकांचे सर्व व्यवहार करणारे बँक कर्मचारी प्रामाणिकता जोपासत आहेत. लॉकडाऊनच्या काळात बँकेतही गर्दी होत नाही. सर्व व्यवहार सुरळीत असल्याने बँक प्रशासनावरील कामाचा ताण कमी झाला.