लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शिक्षणाचा गंध नाही, इतिहासाची कल्पना नाही, विकासाचा पत्ता नाही, बदलत्या जगाच्या घडामोडीपासून कोसोदूर राहिलेल्या भामरागडसारख्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील आदिवासी बांधवांनी पहिल्यांदा चंद्रपूर शहर बघितले. इतकेच नव्हे, तर गोंडकालीन त्यांच्याच पूर्वजांनी बांधलेला किल्ला आणि वास्तू बघून मन भारावून गेले होते. इतिहासाची माहिती जाणून घेताना आपल्याच पूर्वजांनी येथे राज्य केल्याचा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.गुरुवारी जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प अंतर्गत आदिवासी बांधवाची इको-प्रो संस्थेच्या माध्यमाने चंद्रपुरातील ऐतिहासिक गोंडकालीन किल्ला व इतर वास्तु स्थळी भेट देण्यात आली.इको-प्रो संस्थेचे गोंडकालीन ऐतिहासिक वारसा असलेला किल्ल्याचे स्वच्छता अभियान सुरू असून सोबतच आदिवासींचा वारसा असलेला गोंडकालीन इतिहासाचे साक्षीदार अनेक वास्तु येथे आहेत. आज जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत गडचिरोली जिल्हातील डॉ. प्रकाश आमटे यांचे कार्यस्थळ असलेले लोकबिरादरी प्रकल्प येथील आदिवासी बांधव तसेच आजुबाजच्या गावातील गावकरी यांची गुरुवारी सहल चंद्रपूर शहरात किल्ला पर्यटनासाठी आलेली होती. यांसदर्भात इको-प्रोच्या पुरातत्व विभागच्या वतीने या सर्व आदिवासी बांधवाना चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक वारसा आणि त्यांच्या इतिहासाची माहिती यावेळी देण्यात आली.आदिवासी बांधवांना पठाणपुरा गेट, अंचलेश्वर गेट, जटपुरा गेट, वीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके, गोंडराजे राजमहल-कारागृह, बगड खिडकी जवळील देखना बुरूज, गोंडराजे समाधीस्थळ, पुरातन विहीर, अंचलेश्वर मंदीर व महाकाली मंदीर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत या संपूर्ण वास्तुचा इतिहास इको-प्रोचे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी सांगितला. हा संपूर्ण इतिहास ऐकून आदिवासी बांधव हरखून गेले. इतक्या वर्षांपासून हा वारसा आम्ही बघितला नव्हता यांची खंतसुध्दा व्यक्त केली.या उपक्रमाचे आयोजन लोकबिरादरी प्रकल्पाचे अनिकेत आमटे आणि इको-प्रोचे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी केले होते. यावेळी लोकबिरादरी प्रकल्पाचे मनोहर अंपलवार, मुंशी दूर्वा, राहुल भसारकर, जोगा गोटा इको-प्रो संस्थेचे अनिल अडगुरवार, अमोल उटटृलवार, हरीश मेश्राम, अक्षय खनके सहभागी होते.
आदिवासींनी बघितला पूर्वजांचा किल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:19 AM
शिक्षणाचा गंध नाही, इतिहासाची कल्पना नाही, विकासाचा पत्ता नाही, बदलत्या जगाच्या घडामोडीपासून कोसोदूर राहिलेल्या भामरागडसारख्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील आदिवासी बांधवांनी पहिल्यांदा चंद्रपूर शहर बघितले.
ठळक मुद्देइको-प्रोचा उपक्रम : इतिहासाची महती ऐकून भारावले आदिवासी बांधव