लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बामणी परिसरातील अतिक्रमण केलेल्या जागेवर फुकटनगरमध्ये राहणाऱ्या ३२ वर्षीय चंदन नारनवरे याचे बामणीच्या जंगलात हाडे मिळाल्याने बामणीत एकच खळबळ उडाली आहे. ही घटना मंगलवारी बामणी येथील तरुणांच्या सतर्कतेने उघडकीस आली. चंदन हा दहा दिवसांपासून बेपत्ता होता. पोलीस व वनखात्याच्या चमूने लगेच घटनास्थळ गाठून जंगलात सापडलेली हाडे पोस्टमार्टेमसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविली. वाघाच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. चंदन महादेव नारनवरे (३२) याची पत्नी गावाला जाऊन होती. हा एकटाच फुकटनगरमध्ये झोपडी बांधून लहान मुलगा व आजीसोबत राहत होता. १० दिवसांआधी तो घरून बेपत्ता झाला म्हणून हरवल्याची तक्रार त्याच्या काकाने बल्लारपूर पोलीस स्टेशनला दिली होती. आणि बामणीची युवक मंडळी अधूनमधून त्याचा शोधही घेत होती. परंतु बामणी परिसरात वाघाचा वावर एक महिन्यापासून असल्यामुळे शोध घेण्यास अडचण होत होती. मंगळवारी शोध घेताना युवकांना एका व्यक्तीची हाडे मिळाल्याची वार्ता गावात पसरली. गावकऱ्यांनी तिथे पोहोचून घटनास्थळी पडून असलेल्या कपड्यावरून ही हाडे चंदनचीच असल्याचे सांगितले. त्याला वाघानेच मारल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला.
बामणी लावारी परिसरातील जंगलात वाघ दिसल्याचे अनेक लोकांनी व शेतकऱ्यांनी सांगितले आहे. यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे. फुकटनगरमध्ये अनेकांनी घरे बांधली आहे. त्या परिसरात वाघाचा वावर असल्यामुळे त्यांना सावधही केले आहे. - सुभाष ताजने, सरपंच, ग्रामपंचायत, बामणी
घटनेचे गांभीर्य ओळखून वन विभागाने बामणी लावारी परिसरातील जंगलात वाघावर नजर ठेवण्यासाठी कॅमेरे लावले आहे. वनखात्याने चंदनच्या हाडाचे अवयव प्रयोगशाळेत पाठवले असून रिपोर्ट आल्यानंतरच सांगता येणार की मृत्यू कशाने झाला. -संतोष थिपे, वन परिक्षेत्र अधिकारी, बल्लारशाह