प्रशासनाला जाग नाही : पाच वर्षांपासून स्मशानभूमीच्या जागेसाठी संघर्ष
प्रकाश पाटील
मासळ (बु) : गाव तिथे सुसज्ज स्मशानभूमी व्हावी, असा शासनाचा मानस असताना नंदारा गावात अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीसाठी हक्काची जागाच उपलब्ध नाही. गावाच्या अगदी ग्रामपंचायतीसमोरच मृतावर अंत्यसंस्कार केले जातात. असे असतानाही प्रशासनाला जाग आली नाही, हे विशेष.
तालुक्यापासून काही अंतरावर असलेल्या नंदारा गावात स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष उलटूनही समस्या सुटू शकल्या नाही. अंत्यसंस्कारचे सोपस्कार पार पाडण्यासाठी व गावात कोणाचाही मृत्यू झाल्यास चिता जाळण्यासाठी हक्काची जागा नाही. त्यामुळे गावातील नागरिक ग्रामपंचायतीसमोरील खाली जागेत चितेला मुखाग्नी देत आहेत. नंदारा ग्रामपंचायतीने मागील पाच वर्षांपासून निस्तार पत्रकाप्रमाणे तलाठी साजा क्र. ११ भूमापन क्र. ३८ मधील ०.४० हे.आर जागा स्मशानभूमीकरिता मिळावी म्हणून चिमूर महसूल विभागाशी नंदारा ग्रामपंचायतने पत्रव्यवहार केला; मात्र प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नाही. लोकप्रतिनिधीकडूनही फक्त आश्वासनेच मिळतात; मात्र गावकऱ्यांच्या हक्काच्या स्मशानभूमीकरिता जागाच मिळू शकली नाही.
ग्रामपंचायतीसमोरच अंत्यसंस्कार होत असतानाही प्रशासन उघड्या डोळ्याने बघूनही गप्पच असल्याने समस्या ‘जैसे थे’ आहे.
कोट
महसूल विभागाला मागील पाच वर्षांपासून स्मशानभूमीची जागा मिळावी म्हणून पत्रव्यवहार सुरूच आहे; परंतु अजूनपर्यंत पत्राला प्रतिसाद मिळाला नाही.
-केशव गजभे, ग्रामसेवक, नंदारा.
..................................................................................
" स्मशानभूमीसाठी राखीव जागा नसल्याने अंत्यसंस्कार मिळेल त्या जागेवर करावा लागत आहे, तसेच पावसाळ्यात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य राहत असल्याने अनेक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने दखल घेऊन स्मशानभूमीची जागा राखीव करावी.
नत्थु खाटे, गावकरी, नंदारा.
290721\1651-img-20210724-wa0128.jpg
नंदारा ग्रामपंचायतीच्या समोरील खाली जागेतच शेवटचा अत्यसंस्कार करावा लागत आहे.