वसंत खेडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : चंद्रपूरची ऐतिहासिक व धार्मिक ओळख येथील मजबूत किल्ल्याचे परकोट, राजवाडा, महाकाली आणि अंचलेश्वर महादेव मंदिर व येथे उभ्या असलेल्या वास्तुमुळे आहे. त्यातल्या त्यात अंचलेश्वर महादेव मंदिराचे चंद्रपूरच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्व आहे. मुळात चंद्रपूर हे शहर याच धार्मिक स्थळाच्या महात्म्यामुळे वसले आणि ते पुढे विस्तारून आज महानगर झाले आहे. परंतु, चंद्रपूर शहर वसण्याला कारण ठरलेले हे मंदिर व परिसर आज दुर्लक्षित आहे. या परिसराचे सुशोभिकरण तर नाहीच, तेथे पुरेशी प्रकाश व्यवस्थाही नाही. यामुळे चंद्रपूर - बल्लारपूर या मुख्य मार्गावरून रात्री जाणाऱ्या लोकांना हे मंदिर दृष्टीला पडत नाही. अशी अवस्था आहे.आज चंद्रपूर शहर असलेल्या जागेवर सुमारे ५०० वर्षापूर्वी सर्वत्र जंगल होते. या टापूवर गोंड राजाची सत्ता होती. या राज्याचे राजधानी स्थळ वर्धा नदी काठावरील बल्लारशहा, आजचे बल्लारपूर हे होते. राजा खांडक्या बल्लारशाह हे गादीवर बसले होते. त्यांच्या अंगावरील फोडं, विविध उपचार करून ही जात नव्हते. एकदा राजा शिकारीसाठी जंगलव्याप्त या भागात झरपटनदी परिसरात आला असता त्याने जंगलातील कुंडातील पाणी प्राशन करून त्या पाण्याने आपले अंग पुसले. या पाण्याच्या चमत्कारीत गुणामुळे राजाची श्रद्धा या ठिकाणावर बसली. पुढे जंगल साफ करून किल्ला बांधून गाव वसवले. चंद्रपूर असे नाव गावाला देवून बल्लारपूरची राजधानी चंद्रपूर येथे हलविण्यात आली. चमत्कार घडलेल्या ठिकाणावर फार लहान मंदिर उभारले. तद्नंतर गादीवर बसलेल्या कर्तबगार राणी हिराई यांनी आज उभे असलेले हे लहान पण देखणे मंदिर बांधले. मंदिराचा बाह्य भाग विविध प्रकारच्या आकर्षक शिल्पांनी सजविला. राणी हिराई यांनी राजा विरशहा यांची देखणी समाधी या मंदिराजवळ बांधली. तद्नंतर भोसले यांनी मंदिरापुढे सभामंडप उभारले. आजही हे मंदिर उत्तम स्थितीत उभे आहे. मंदिरावरील दोन वर्षापूर्वी, पुरातत्व विभागाकडून विशिष्ट रसायन वापरून या शिल्पांना स्वच्छ करण्यात आले. यामुळे शिल्पांना पुर्वीसारखा लखलखीतपणा आला आहे. मंदिराच्या संरक्षण भिंतीचा, झरपट नदीकडील भाग कोसळला होता. त्या ठिकाणी तशीच भिंत उभी केली. भाविकांची या धार्मिक स्थळावर श्रद्धा आहे. पर्यटक मंदिरावरील शिल्प बघून अवाक् होतात. महाशिवरात्री, चैत्राची महाकाली जत्रा, श्रावण मास अशा प्रसंगी भाविकांची या ठिकाणावर गर्दी होते. या मंदिर परिसराचे हवे तसे सुशोभिकरण झाले नाही. या मंदिर परिसरात प्रकाश व्यवस्थाही पुरेशी नाही. रात्री हा भाग अंधारलेला असतो. त्यामुळे मंदिरालगतच्या मुख्य मार्गाने रात्री जाणाऱ्यांना या ठिकाणी विविध शिल्पांनी सुशोभित देखणे मंदिर आहे हे दिसून येत नाही. रात्रीला हे मंदिर लखलखीतपणे दिसावे, अशी पुरेशी प्रकाश व्यव्स्था आणि सुशोभिकरण करण्याची गरज आहे.
अंचलेश्वर महादेव मंदिर अद्यापही उपेक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2018 9:52 PM
चंद्रपूरची ऐतिहासिक व धार्मिक ओळख येथील मजबूत किल्ल्याचे परकोट, राजवाडा, महाकाली आणि अंचलेश्वर महादेव मंदिर व येथे उभ्या असलेल्या वास्तुमुळे आहे. त्यातल्या त्यात अंचलेश्वर महादेव मंदिराचे चंद्रपूरच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्व आहे. मुळात चंद्रपूर हे शहर याच धार्मिक स्थळाच्या महात्म्यामुळे वसले आणि ते पुढे विस्तारून आज महानगर झाले आहे.
ठळक मुद्देसुशोभिकरण व प्रकाश व्यवस्थेची गरज