गोंडपिपरी तालुक्यातील प्राचीन रिठात समावेश
नीलेश झाडे
गोंडपिपरी : गोंडपिपरी तालुक्याला महापाषाण ते ब्रिटिशकालीन इतिहासाचा स्पर्श झालेला आहे. कधी काळी मोठी वसाहत असलेली गावे आज ओसाड झालीत. या गावांचा साधा उल्लेखही इतिहासाच्या पानांत आढळत नाही. मात्र तालुक्यातील एका प्राचीन रिठाची नोंद थेट गुगलवर आढळते. हा रीठ व्यंकटपूर-बोरगाव मार्गावर असून, ‘पातळवाडा’ असे या रिठाचे नाव आहे.
गोंडपिपरी तालुक्याचा अनेक भागांत पुराण अश्मयुग, मध्याक्ष्मयुग, नवाश्मयुग, ताम्रयुग, महापाषाण युगाचे अवशेष आढळले आहेत. शांताराम भालचंद्र देव या इतिहास संशोधनात मोठे नाव असलेल्या अभ्यासकांनी गोंडपिपरीच्या इतिहासाची दखल घेतली आहे. महापाषानानंतर प्राचीन इतिहासात मौर्य, सातवाहन, वाकाटक, शुंग, चालुक्य, परमार, गोंड, भोसले, ब्रिटिश काळातील इतिहासाच्या अनेक खुणा गोंडपिपरी तालुक्याच्या भूगर्भात आढळून आल्या आहेत. तालुक्यात शेकडो प्राचीन रीठ आहेत. या रिठावर अवशेष सापडतात. मात्र त्यांचा उल्लेख इतिहासाच्या पानात आढळत नाही. अशातच तालुक्यातील एका प्राचीन रिठाचा उल्लेख गुगल मॅपवर दिसत आहे. त्या रिठाचे नाव आहे पातळवाडा. प्राचीन पातळवाडाला महापाषाण संस्कृतीचे मुंबई येथील अभ्यासक अमित भगत यांनी भेट दिली होती. या परिसरात मध्याक्ष्म युगातील काही हत्यारे त्यांना आढळून आली. ऐतिहासिक वारसा संवर्धन समितीचे अध्यक्ष अरुण झगडकर आणि त्यांच्या टीमने या भागात संशोधन केले. त्यांना या परिसरात साधारणत: हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या वस्तीचे पुरावे आढळून आले.
बॉक्स
ब्रिटिशकाळात महसुली गाव
ब्रिटिशकाळात पातळवाडा महसुली गाव होते. कधी काळी मोठी वस्ती असलेले पातळवाडा आज ओसाड झाले आहे. दूरदूरपर्यंत वस्ती नाही. केवळ महसुली नोंद उरली आहे. अशातच गुगल मॅपवर पातळवाडा हे नाव आजही ठळक अक्षरात दिसत आहे. एका प्राचीन गावाच्या इतिहासाची चर्चा गुगलमुळे अधूनमधून होत आहे.
कोट
पातळवाडा हे एक प्राचीन रीठ आहे. आम्ही केलेल्या संशोधनात येथे प्राचीन वस्तीचा खुणा आढळून आल्या आहेत. महसूल विभागात आजही पातळवाडाची नोंद आहे. या भागात उत्खनन केल्यास प्राचीन पातळवाडाचा खरा इतिहास समोर येऊ शकतो.
- अरुण झगडकर, अध्यक्ष, ऐतिहासिक वारसा संवर्धन समिती.
बॉक्स
पातळवाड्यात आज केवळ शेतजमीन
कधी काळी मोठी वस्ती असलेल्या पातळवाड्यात आज केवळ शेतीच दिसते. ज्या जमिनीवर वस्ती होती, तिथे शेती व झुडुपी जंगल आहे. साधारणत: १०० हेक्टरच्या आसपास शेतजमिनी आहेत.