अखेर ते ठरले पोलिसांचे पथसंचलन : शांतता व सुव्यवस्था ठेवण्याचा पोलिसांचा प्रयत्न लोकमत न्यूज नेटवर्क आयुध निर्माणी (भद्रावती) : शनिवार शहरातील गजबजलेला गांधी चौकरस्त्याच्या बाजूला पन्नासच्या वर पोलीस व पोलीस अधिकारी यांची संरक्षण साहित्यासह उपस्थिती अन् पोलिसांचा जमाव पाहून तेथून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांची होणारी त्रेधातिरपट. एखाद्या चित्रपटाला शोभावे असे ते दृश्य भद्रावतीच्या वर्दळीच्या ठिकाणी गांधी चौकात भद्रावतीकरांनी अनुभवले. अखेर ते भद्रावती पोलिसांचे पथसंचलन आहे ही माहिती पुढे आली अन् भद्रावतीकरांनी घेतला सुटकेचा श्वास. ‘सदरक्षणाय, खलनिग्रहणाय’ हे पोलिसांचे ब्रिदवाक्य आहे. दुर्जणांना धाक व सज्जनांचे संरक्षण हे पोलीस विभागाचे काम आहे. त्यामुळे खाकीवर्दी समोर दिसतात अनेकांना जबरदस्त घाम सुटतो. त्यामुळे असामाजिक तत्व पोलीस दिसताच पळ काढतात. आणि सामान्य माणसांना आपल्या सोबत कोणीतरी आहे, हे पाहून धीर वाढतो. परंतु वरील दृश्य पाहून भद्रावतीच्या मुख्य मार्गावरुन येणाऱ्या- जाणाऱ्यांच्या मनात भिती निर्माण झाली. एवढ्या मोठ्या संख्येने एकाच ठिकाणी इतकी मोठी पोलिसांची कुमक पाहून सामान्य नागरिक, महिला, बालके भेदरलेल्या नजरेने बघत जात होते. आपल्या शहरात काही विपरीत घडले, तर नाही ना? ही अनामिक भिती उपस्थितांच्या चेहऱ्यावर दिसत होती. भर रस्त्यावर एवढ्या मोठ्या संख्येने पोलीस कशासाठी? हा प्रश्न अनेकांच्या चेहऱ्यावर जाणवत होता. मात्र चौकशी अंती कळले की, ते पोलिसांचे पथसंचलन (रंगीत तालीम) होती. आगामी सन उत्सवाच्या काळात जनतेमध्ये सुरक्षीततेची भावना निर्माण व्हावी, व त्यांनी आपआपले सण उचीत आनंदाने साजरे करावे, या उद्देशाने सदर कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यातून कोणत्याही घटनेला उत्तर देण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे. असामाजिक तत्वांनी यांची नोंद घ्यावी, हा संदेश दिला. पोलीस अधीक्षक नियती ठाकर, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत व उपविभागीय अधिकारी प्रताप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती ठाणेदार विलास निकम, त्यांचे पाच अधिकारी ४८ कर्मचारी उपस्थित होते.
अन् भद्रावतीकरांनी घेतला सुटकेचा श्वास
By admin | Published: June 29, 2017 1:36 AM