राजकुमार चुनारकर।आॅनलाईन लोकमतचिमूर : नेहमीप्रमाणे ती आपल्या शेतात कापूस वेचण्याकरिता गेली. दुपारचे १२ वाजले होते. कापूस वेचण्यात मग्न असताना कुणीतरी मागे आल्याचा भास झाला. मागे वळून बघते तर चक्क पट्टेदार वाघ उभा. काही कळायच्या आत वाघाने आपला पंजा तिला मारताच तिने कापसाचे गाठोडे पुढे केले आणि वाघाचा वार त्या गाठोड्यावर गेला. गाठोड्याला ढाल करून तिने आरडाओरड सुरू केली आणि रस्त्याने जाणारी मंडळी त्या दिशेने धावली. लोक येत असल्याचे पाहुन वाघाने तेथून धूम ठोकली अन् तिचा जीव भांड्यात पडला. हा थरार सोनेगाव काग येथील रेखा गजानन उताने या महिलेले चिमूर-नेरी मार्गालगतच्या शेतात अनुभवला. सुदैवाने तिला इजा झाली नाही.चिमूरपासून अवघ्या ३ किलोमीटरील नगर परिषदेत समाविष्ट सोनेगाव काग येथील रेखा उताने ही नेहमीप्रमाणे आपल्या शेतात कापूस वेचण्यासाठी गेली होती. वाकून कापूस वेचत असताना अचानक मागून कुणीतरी ओढल्याचा भास रेखाला झाला. ती मागे वळून बघते, तर चक्क पट्टेदार वाघ उभा होता. एक तर जीव वाचणार वा जाणार, म्हणून रेखाने मोठ्या हिंमतीने कापसाच्या गाठोड्यालाच ढाल करून आरडाओरड सुरू केली. चिमूर-नेरी मार्गावरून ये - जा करणाºया वाहनधारकांपर्यंत तिचा आक्रोश गेला आणि काही जणांनी शेताकडे धाव घेतली. नागरिकांना पाहून रेखाच्या जवळ उभ्या असलेल्या वाघाने पळ काढला अन् रेखाने सुटकेचा नि:श्वास टाकला. कळमगाव येथील अंकीत गुलाब लाडसे सायकलने त्याच परीसरात आईसाठी डबा घेऊन येत असताना डांबररोडवर त्यालाही वाघ उभा असल्याचे दिसून आले. मागील दोन महिन्यांपासून या परिसरात दोन वाघांचा वावर आहे. याच मार्गावर काही दिवसांपूर्वी बागला कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी कॉन्व्हेंटच्या बाजूला वाघ पाहिला होता. या वाघाने परिसरात दोन गायी मारल्या होत्या. आज ही घटनाही याच परिसरात घडली आहे. या संदर्भात वनविभागाला माहिती मिळताच वाघाला शोधण्यासाठी पथक घटनास्थळी रवाना झाले. मात्र वाघाचा थांगपत्ता लागला नाही.
अन् कापसाचे गाठोडे बनले रेखाची ढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 11:50 PM
नेहमीप्रमाणे ती आपल्या शेतात कापूस वेचण्याकरिता गेली. दुपारचे १२ वाजले होते. कापूस वेचण्यात मग्न असताना कुणीतरी मागे आल्याचा भास झाला.
ठळक मुद्देचिमूर-नेरी मार्गावरील थरार : वाघाचा वार गेला कापसावर