चंद्रपूर : अनेक वर्षांपासून जुनाट भग्न झोपडीवजा घरात राहणे, ना नातलग, ना आप्तेष्ट तरीही हसतमुखाने धुणीभांडी करून पोटाची खडगी भरणारी ५० वर्षीय शोभा दुर्गे या निराधार जीवन कंठीत होत्या. शासनाच्या अनेक घरकुल योजना आहे. परंतू अज्ञान, आवश्यक कागदपत्रांचा अभाव आणि संबंधित अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी, यामुळे त्या घरापासून वंचित राहिल्या. अखेर लोकसहभागातून तिला हक्काचा निवारा भेटलाच.शोभा दुर्गे यांचा फाटक्या घरातील संघर्ष बघून जटपुरा वार्ड क्र. २ चे रहिवासी हळहळले. जटपुरा युवक मंडळाचे सदस्य कार्यकर्ते मोहन डोंगरे पाटील, संतोष मिश्रा व संजय वानखेडे या त्रयीने पुढाकार घेऊन वॉर्डातील नागरिकांच्या आर्थिक मदतीने लोकवर्गणीतून तिचा निवारा उभा करून दिला.फरीदभाई (ठेकेदार) यांनी श्रमदानातून तिच्या निवाऱ्याला घराचे रूप दिले. शासनाकडून एक रुपयाची अपेक्षा न ठेवता संपुर्ण नागरिकांच्या सहभागातून या युवकांनी एक आदर्श समाजासमोर ठेवला, या शंका नाही.या सामाजिक सेवा कार्यासाठी नगरसेवक प्रवीण पडवेकर, दीपक कटारे, बिन्नू मिश्रा, रमेश व अशोक काहीलकर तसेच वॉर्डातील समस्त महिलावर्ग व आबालवृद्धांनी यथाशक्ती आर्थिक मदत देऊन आपले सामाजिक योगदान दिले. (शहर प्रतिनिधी)
अन् तिला मिळालं हक्काचं घरटं !
By admin | Published: February 23, 2016 12:42 AM