चंद्रपूर : बसस्थानकावर बेवारस स्थितीमध्ये आढळणाऱ्या एका मुलीला चंद्रपुरातील सामाजिक कार्यकर्त्या, ॲड. मंजू लेडांगे यांच्या पुढाकाराने स्वाधार गृह महिला आश्रयस्थान येथे राहण्याची व्यवस्था करून देण्यात आली. त्यापूर्वी तिची संपूर्ण आरोग्य तपासणी करून तिच्यावर औषधोपचार करण्यात आला. तसेच तिच्या कुटुंबीयांचा शोधही सुरू असून, लवकरच तिला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.
२२ जून रोजी चंद्रपूर बसस्थानकाचे आगारप्रमुखांनी मनसेच्या कार्यकर्त्या ॲड. मंजू लेडांगे यांना फोन करून एक मुलगी मागील दोन ते तीन दिवसांपासून बसस्थानकावरच बेवारस स्थितीत वावरत असल्याचे सांगितले. ॲड. लेडांगे यांनी लगेच बसस्थानक गाठून त्या मुलीजवळ जाऊन तिची विचारपूस केली. ती अत्यंत घाबरली होती. तिला विश्वासात घेऊन तिला धीर दिला. त्यानंतर तिची विचारपूस करण्यात आली. मात्र तिने व्यवस्थित माहिती दिली नाही. ती मानसिकरीत्या खचली असल्याचे दिसून आले. मात्र हिला असेच सोडले तर तिला धोका होऊ शकतो, अशी भीती ॲड. लेडांगे यांना वाटली. त्यांनी लगेच चंद्रपूर रामनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तिला रामनगर पोलिस ठाण्यात नेण्यात आला. त्यानंतर चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनचे सचिव ॲड. आशिष धर्मपुरीवार, ॲड. आशिष मुंधडा यांना ॲड. लेडांगे, अमित भारद्वाज, अभिषेक मोहुर्ले यांच्यासह मनसेचे विजय तुरकयाल, महेश वासलवार, सुनील गुढे, अनिकेत लांजेवार यांना माहिती दिली. तेसुद्धा लगेच रामनगर ठाण्यात पोहोचले. त्यानंतर तिची चंद्रपूर जिल्हा शासकीय रुग्णालयात मानसिक तपासणी करण्यात आली. त्यानंतर बालसंरक्षण अधिकारी अजय साखरकर, बालकल्याण समिती अध्यक्ष क्षमा बासरकर धर्मपुरीवार यांच्या सहकार्याने स्वाधार गृह महिला आश्रयस्थान, वसतिगृहात तिची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. ॲड. आशिष मुंधडा, एपीआय योगेश हिवसे यांनी तिला स्वाधार गृह महिला आश्रयस्थानात सोडून दिले. तिच्या नातेवाइकांचा शोध सुरू असून, लवकरच तिला त्यांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.
विकलेल्या घरासमोर सुरू असतो तिचा आकांतॲड. लेडांगे यांनी त्या मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, तिच्या आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर तिच्या भावाने चंद्रपूर येथील घर विकून तिला असेच सोडून तो पुणे येथे राहण्यास गेला असल्याचे सांगितले. याचा जबर धक्का तिला बसला. ती दररोज आपल्या घरासमोर बसून बंद घराकडे बघत असते अन् रात्री बसस्थानकावर येऊन झोपत असते. परंतु, आता तिला हक्काचा निवारा प्राप्त झाला असून, तिच्या नातेवाइकांचा शोध सुरू आहे.