त्यांच्या पक्षीप्रेमाने घरीच झाला चिवचिवाट
गोवरी : सध्या एप्रिल महिन्याच्या अखेरीस सूर्य चांगलाच तापल्याने माणसांसह पशू, पक्ष्यांनाही त्याची चांगलीच झळ सोसावी लागत आहे; मात्र राजुरा तालुक्यातील भेदोडा येथील सामाजिक कार्यकर्ते उमेश पारखी यांनी सामाजिक भावनेतून चिमण्यांसाठी चक्क घरीच ‘घरटे’ बांधून त्यांना आश्रय दिला आहे.
सध्या कोरोनासारख्या जागतिक महामारीने सर्वच संकटात सापडले आहेत. कोरोनामुळे यावर्षी जीव वाचविणे मुश्किल झाले आहे. अशातच एप्रिल महिन्याच्या अखेरीस सूर्याच्या प्रखर झळा माणसांसह पशू, पक्ष्यांनाही अत्यवस्थ करणाऱ्या आहेत; मात्र सामाजिक दायित्व जोपासत आपणही पक्ष्यांसाठी काहीतरी चांगले करावे, या उद्दात हेतूने राजुरा तालुक्यातील भेदोडा येथील सामाजिक कार्यकर्ते उमेश पारखी यांनी चिमण्यांसाठी घरीच घरटे बांधले. यासाठी त्यांचा मुलगा प्रणय पारखी यांचेही या कामासाठी महत्त्वाचे सहकार्य लाभले. चिमण्यांसाठी स्वखर्चातून घरटे विकत आणून ते घराच्या अंगणातील शेडमध्ये छताला बांधून त्यांना हक्काचे घर उपलब्ध करून देऊन चिमण्यांना राहण्याची व्यवस्था करून दिली. सोबतच चिमण्यांना दाना-पाण्याची सोय करून दिली. त्यामुळे अंगणातील चिमण्यांचा रमणारा चिवचिवाट मनाला आनंद देणारा असल्याची प्रतिक्रिया उमेश पारखी यांनी ‘लोकमत’ला दिली.
कोट
पक्ष्यांची संख्या दिवसागणिक कमी होत चालली आहे. उन्हामुळे सर्वच प्राणीमात्रांचा जीव कासावीस झाला आहे. आपणही समाजाचे देणे लागतो, या भावनेतून पक्ष्यांसाठी जे चांगले करता येईल, या उदात्त हेतूने घराच्या अंगणातील शेडमध्ये चिमण्यांसाठी घरटे बांधून त्यांच्या राहण्याची सोय करून दिली.
-उमेश पारखी
सामाजिक कार्यकर्ते, भेदोडा