चंद्रपूर : अंगणवाडी सेविकांना ग्रॅच्युइटी लागू करा, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. ग्रॅच्युइटीचा मुद्दा ज्यावेळी विधानसभेत गाजला तेव्हा चर्चेला उत्तर देताना महिला बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अंगणवाडी सेविकांना ग्रॅच्युइटी देण्याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे ठोस आश्वासन विधिमंडळात दिले. मात्र, अजूनही अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना त्वरित ग्रॅच्युइटी लागू करा, अशी मागणी चंद्रपुरात आयोजित अंगणवाडी सेविकांच्या विभागीय मेळाव्यात करण्यात आली.
चंद्रपूर येथे अंगणवाडी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची विदर्भस्तरीय बैठक पार पडली. यावेळी प्रा. रमेशचंद्र दहिवडे, पंजाबराव गायकवाड, भव्या देशकर, सुनंदा बावणे, छाया कागदेलवार आदींची यावेळी उपस्थिती होती. बैठकीला बुलढाणा, नागपूर, वर्षा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आदी जिल्ह्यांतील कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, १ मे रोजी विभागीय मेळाव्याचे आयोजन चंद्रपूर येथे करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी माया वाहाणे, बुलढाणा, कल्पना पटले गोंदिया, रंजना सावरकर वर्धा, सरिता आत्राम वडसा, चंदा मारिया नागपूर, जी. रमना उपस्थित होते.
दीर्घकाळापासून सेवा करणाऱ्या मदतनीसांना दहावीच्या आधारावरच पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. आपल्याला न्यायहक्क मिळवून घेण्याकरिता दीर्घ व व्यापक लढा आपण उभारला, पाहिजे. त्याच उद्देशाने विदर्भस्तरीय मीटिंगचे आयोजन केल्याचे यावेळी पंजाबराव गायकवाड म्हणाले. या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. प्रास्ताविक कल्पना पटेल यांनी केले. आभार संध्या खनके यांनी मानले.