पळसगाव येथील वाघिणीचा थरार
चिमूर : चिमूर तालुक्यातील पळसगाव येथे बुधवारी सकाळी वाघीण व दोन बछड्यांनी गावालगत येत गावकऱ्यांत दहशत निर्माण केली होती. त्यामुळे या वाघिणीला गावाजवळून पांगवण्यासाठी वाघ सुरक्षा दलाचे कर्मचारी गेले असता एका कर्मचाऱ्यावर वाघिणीने हल्ला करून ओढत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांनी हिम्मत दाखवून जीवाची पर्वा न करता त्याला मृत्यूच्या दाढेतून सोडवून आणले. हे दोन वनकर्मचारी सुनीलसाठी देवदूतच ठरले आहेत.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या पळसगाव (पिपर्डा) येथे बुधवारी सकाळी वाघीण व तिच्या दोन बछड्यांनी गावाशेजारी येत एका नागरिकाला जखमी करीत खळबळ माजविली. त्यामुळे या वाघिणीला व बछड्यांना गावाच्या बाहेर पिटाळून लावण्यासाठी वाघ सुरक्षा दलाचे वनकर्मचारी व पोलीस कर्मचारी प्रयत्न करीत होते. याच दरम्यान वनकर्मचारी व पोलीस कर्मचारी घोळक्यात असताना काही कळायच्या आत त्या वाघिणीने वाघ सुरक्षा दलाचे कर्मचारी सुनील व्यंकटराव गजलवार यांच्यावर हल्ला करीत त्याला ओढत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्यासोबत असलेल्या वाघ सुरक्षा दलाचे कर्मचारी परमेश्वर तांबुळगे व संभाजी देविदास बळदे यांनी त्या चवताळलेल्या वाघिणीचा हिमतीने पाठलाग करून जवळ असलेल्या काठीने वाघिणीला मारून हाकलून लावले व आपल्या सहकारी कर्मचाऱ्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढून शौर्याचा परिचय दिला. सुनीलला मानेवर व पाठीवर वाघिणीने गंभीर जखमा केल्याने सुनीलवर चंद्रपूर येथे उपचार सुरू आहेत. परमेश्वर व संभाजी यांच्या या शौर्याची शासनाने दखल घेण्याची गरज आहे.