लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ताडाळी एमआयडीसी परिसरातील सिद्धबली इस्पात कंपनीत सोमवारी मध्य प्रदेशातील शैलेंद्र नामदेव या कामगाराचा अपघाती मृत्यू झाला. मात्र, व्यवस्थापनाने हे प्रकरण दडपण्याच्या हेतूने मृत कामगाराचे पार्थिव परस्पर नागपूरला हलविले आणि पोलिसांची दिशाभूल केल्याचा आरोप कामगारांनी केला. दरम्यान, व्यवस्थापनाच्या चुकीमुळे कामगाराचा मृत्यू झाल्याने कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी मंगळवारी कंपनीला भेट दिल्यानंतर केली आहे. मध्य प्रदेशातील शैलेंद्र नामदेव हा कामगार सिद्धबली इस्पात कंपनीत कार्यरत होता. कंपनीत सुरक्षा अधिकारी नाहीत. मृत कामगार व इतर कामगार कर्मचाऱ्यांना हेल्मेट, सेफ्टी शूज पुरविले नाही. सिद्धबली इस्पातच्या व्यवस्थापनात बदल झाला.परंतु, कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले. शैलेंद्र नामदेव यांना सुरक्षा साधने पुरविली असती तर जीव वाचला असता, असेही कामगारांचे म्हणणे आहे. मंगळवारी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी कंपनीतील घटनास्थळ गाठले. कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. काही कामगारांना कंपनीने कामावरून कमी केले. त्यांना पूर्ववत घेण्याची मागणी केली. कामगार गंभीर जखमी होता तर लगेच चंद्रपुरातील वैद्यकीय सेवा का पुरविण्यात आली नाही, असा प्रश्नही अहिर यांनी उपस्थित केला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेडकर, पोलीस निरीक्षक कासार, येरुरचे सरपंच मनोज आमटे, सोनेगाव सरपंच संजय उकीनकर, पडोली ग्रामपंचायत सदस्य विक्की लाडसे उपस्थित होते.