वरोरा : दिंदोडा येथे वर्धा नदीवर होणाऱ्या बॅरेज प्रकल्पाच्या अहवालातील त्रुटी आधी दुरुस्त करा. नंतरच जनसुनावणी घ्या, अशी जोरकस मागणी करीत प्रकल्पग्रस्तांनी गुरुवारी दिंदोडा येथे झालेल्या पर्यावरण विषयक जनसुनावणीत संतप्त भावना व्यक्त केला.प्रकल्पग्रस्तांच्या गोंधळामुळे जनसुनावणीत थोडावेळा चांगलाच गोंधळ उडाला. परंतु काही वेळाने परिस्थिती शांत झाली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे आज गुरुवारी दिंदोडा येथे झालेल्या जनसुनावणीला दिंदोडा, बोरी, सावंगी, नागरी, सोईट, वंधली, वणी, माढेळी, बोरी इत्यादी प्रकल्पबाधित गावातील शेतकरी उपस्थित होते. अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे हे पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होते. जनसुनावणीला सिंचाई विभागाचे कार्यकारी अभियंता काळे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अ. ना. हर्षवर्धन, उपप्रादेशिक अधिकारी स. दे. पाटील, वरोऱ्याचे उपविभागीय अधिकारी जे. पी. लोढे उपस्थित होते.राहूल सराफ यांनी अभ्यासपूर्ण निवेदन केले. १ जानेवारी २०१४ ला केंद्र शासनाने जमीन भूसंपादनासाठी नवीन कायदा केल्याने १८९४ चा कायदा रद्द झाला. त्यामुळे त्या कायद्याने संपादीत केलेल्या जमिनीची जनसुनावणी घेणे गैर असल्याचा युक्तीवाद करीत नवीन कायद्यानुसार जमिनीचे अधिग्रहण करण्याची मागणी केली.माढेळीचे प्रकाश मुथा यांनीही याच स्वरूपाची भूमिका विषद केली. ओमप्रकाश मांडवकर यांनी यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील सावंगी येथे झालेल्या जनसुनावणीत दाखविलेल्या त्रुटी दुरुस्त न करता पुन्हा जनसुनावणी घेत असल्याबद्दल प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. (तालुका प्रतिनिधी)
दिंदोडा बॅरेजच्या जनसुनावणीत प्रकल्पग्रस्तांचा संताप उफाळला
By admin | Published: January 08, 2015 10:51 PM