लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रियकराकडून महिलेचा खून करण्यात आल्याची घटना नागभीड येथील मध्य वस्तीत घडली. या घटनेने नागभीड येथे खळबळ उडाली आहे.पूजा निलकुमार बागडे (२७) असे मृत महिलेचे तर विवेक ब्रह्मदास चौधरी (२६) असे आरोपीचे नाव आहे. पूजा ही चवडेश्वरी मंदिर परिसरात आपल्या आईसोबत भाड्याच्या घरी राहत होती. पूजाचे लग्न काही वर्षांपूर्वी चिखलपरसोडी येथील निलकुमार याच्याशी झाले होते. पण फारकत झाल्याने पूजा आईसोबतच नागभीड येथे राहत होती. पूजाचा पती आणि विवेक हे एकाच गावचे असल्यामुळे त्यांचे संबंध होते.
विवेक हा पूजाला नेहमीच लग्नासाठी तगादा लावत होता. याच कारणावरून शुक्रवारी पूजा आणि विवेकचे जोरदार भांडण झाले होते. राग अनावर झाल्याने शनिवारी पूजाची आई घराबाहेर गेल्याची संधी साधून आरोपीने मागील दरवाजातून घरात प्रवेश केला व पूजाच्या मानेवर चाकूने वार केले. अति रक्तस्राव झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. विवेकचे हे अमानुष कृत्य सुरू असताना तिच्या आईला किंकाळी ऐकू आल्याने ती लगबगीने घरात गेली असता, चाकू कंबरेला खोचून विवेक मागील दाराने पळून गेला. काही वेळानंतर त्याने पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले.